ठाणे : वाहतूकीच्या दृष्टिने अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे सोमवारी सांयकाळी रांजनोली नाका ते तीन हात नाकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे कामानिमित्ताने नाशिक, भिवंडीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. अवघ्या १० मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना सुमारे पाऊण तास लागत होता.
मुंबई नाशिक महामार्गाहून दिवसाला हजारो वाहने वाहतूक करतात. मागील काही दिवसांपासून या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून याठिकाणी तात्पुरती खड्डे भरणी केली जाते. त्यानंतर पाऊस पडल्यास पुन्हा या मार्गावर खड्डे पडतात. ठाण्यात सोमवारी पडलेल्या पावसामुळे मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा खड्डे पडले. त्याचा परिणाम येथील वाहतूकीवर झाला. सोमवारी सायंकाळी रांजनोली नाका ते तीन हात नाका पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
हेही वाचा >>> उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेला आली जाग; पालिकेने हाती घेतली ‘ही’ मोहिम
मुंबईत कामानिमित्ताने वाहतूक करणारे अनेक नोकरदार रात्रीच्या वेळी पुन्हा ठाणे, भिवंडी, कल्याणच्या दिशेने वाहतूक करतात. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना वेळेत घरी पोहचता आले नाही. अवघ्या १० मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना पाऊण तास लागत होता. अनेक बसगाड्या या कोंडीत अडकून होत्या. रात्री ८.३० नंतर येथील वाहतूक कोंडी काहीशी सुटली होती. काल्हेर, भिवंडी मार्गावरही खड्ड्यांमुळे तसेच सतत सुरू असलेल्या पावसामुळे वाहतूकीचा वेग मंदावून वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे नारपोलीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचेही हाल झाले.