ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीच्या दृष्टिने महत्त्वाच्या असलेल्या मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या सुमारे २४ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. आता हा प्रकल्प आता मे २०२५ पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रकल्पाचे काम लांबणीवर पडल्याने या मार्गावर आणखी वर्षभर कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे.

मुंबई नाशिक महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टिने महत्त्वाचा आहे. दररोज हलक्या वाहनांसह उरण जेएनपीटी येथून सुटणाऱ्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकही या मार्गावरून होत असते. हा महामार्ग असूनही अनेक ठिकाणी अरुंद आहे. तसेच रस्त्याची अवस्था देखील अत्यंत वाईट झाली आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यारित आहे.

आणखी वाचा-अंबरनाथकरांना एक दिवसाआड पाणी, बदलापुरातही दोन दिवस टंचाईचे

प्राधिकरणाकडून या रस्त्याची दुरुस्ती केली जात नव्हती. त्यामुळे पावसाळ्यात माजिवडा, साकेत, खारेगाव, भिवंडी भागात मोठ्याप्रमाणात खड्डे पडत होते. येथील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. यावरून टिका होऊ लागल्याने राज्य रस्ते विकास मंडळाने माजिवडा ते वडपे या रस्त्याचे काम २०२१ पासून हाती घेतले. सुमारे २४ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे.

याच मार्गाला समृद्धी महामार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावर वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासोबतच येथील साकेत, खारेगाव या खाडी पूलांच्या प्रकल्पाचे महत्त्वाची कामे केली जात आहेत. तसेच भिवंडी येथील एक रेल्वे पूल आणि वडपे उड्डाणपूलाची कामांचीही यात समावेश आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु विविध तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पाचे काम वेळेत पुर्ण होऊ शकलेले नाही. या प्रकल्पाचे काम केवळ ६० टक्के पूर्ण झाले आहे.

आणखी वाचा-तुरुंगात जावे लागत असेल तर कंपनीच बंद करू, डोंबिवली एमआयडीसीतील युवा उद्योजकांची उव्दिग्नता

येत्या तीन महिन्यांत उर्वरित ४० टक्के पूर्ण होणे शक्य नसल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रकल्प कामाला मे २०२५ पर्यंत मुदतवाढ घेण्याचे ठरविले आहे. ठाणे शहर, घोडबंदर भागात पावसाळ्यापूर्वी अनेक रस्त्यांची कामे, मेट्रो मार्गिका निर्माणाची कामे यामुळे अवजड वाहनांसाठी करण्यात आलेले वाहतुक बदल, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची निवडणूक प्रचाराच्या कालावधीतील वाहतूक तसेच निवडणूकीच्या कालावधीत मजूर गावी जाणे अशा विविध कारणांमुळे प्रकल्पाचे काम लांबणीवर पडले आहे. त्यामुळे आता वर्षभरानंतरच ठाणेकरांची कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • एकूण १ हजार १८२ कोटी ८७ लाख रुपये या प्रकल्पासाठी खर्च होत आहे.
  • खारेगाव येथे ३८ मार्गिकांचा टोलनाका
  • चार पदरी मुख्य मार्गिकांचे आठ पदरी मार्गामध्ये रुपांतर तसेच प्रत्येकी दोन-दोन पदरी सेवा रस्ते.
  • महामार्गावरील महत्त्वाच्या पूलांपैकी खारेगाव पूलाचे ६२ टक्के, साकेत पूलाचे ६९ टक्के, रेल्वेपूलाचे ३० टक्के आणि वडपे उड्डाणपूलाचे ३७ टक्के काम पूर्ण झाले आहे.