ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना संपविण्याची धमकी देणारे ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यासाठी विविध प्रभाग समितीमधील लिपीक, शिपाई, काही खाजगी व्यक्ती पैसे गोळा करीत असून, त्यांनी घरकुल घोटाळे केले आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. आहेर हे गुंडाच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात आणि गुंड आहेर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पालिकेत हजेरी लावतात. त्यांची शैक्षणिक अर्हता खोटी आहेत. या सर्वांचे पुरावे पालिका आणि पोलीस आयुक्तांना देणार असून पोलिसांनी आहेर यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आरोपांसंदर्भात ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याशी संपर्क साधला असता, बाहेर असल्यामुळे आता काहीच प्रतिक्रीया देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – डोंबिवली: घरफोड्या करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर उर्फ बाबाजीच्या मदतीने गुंड तैनात केल्याची ध्वनिफीत समाजमाध्यमांवर काही दिवसांपूर्वी प्रसारित झाली होती. या ध्वनिफीतीमधील आवाज साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा आरोप आमदार आव्हाड यांनी केला होता. याप्रकरणी महेश आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणात आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील काही जणांना पोलिसांनी अटकही केली होती. आव्हाड यांनीही धमकी प्रकरणी महेश आहेर यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तसेच आहेर यांच्या कार्यालयातील कर्मचारी पैसे मोजतानाची एक चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित केली होती. तसेच आहेर यांना महापालिका सेवेतून बडतर्फ करून त्यांना अटक करण्याची मागणी दोन्ही काँग्रेसकडून केली जात आहे. असे असतानाच ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आहेर यांच्यावर गंभीर आरोप केले.
आहेर यांच्या कार्यालयातील शिपाई, इतर काही सदस्य, प्रभाग समितीमधील लिपीक आणि काही शिपाई हे दररोज आहेर यांच्यासाठी पैसे गोळा करीत असल्याचा आरोप करत यासंबंधीचे पुरावे पालिका आणि पोलीस आयुक्तांकडे सादर केले असल्याचे यांनी सांगितले. अनाधिकृत बांधकाम प्रकरणी यापूर्वीच त्यांची चौकशी लावण्यात आली असतानाही त्यांच्याकडेच या विभागाचा अतिरिक्त कार्यभार कसा सोपविण्यात आला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आहेर यांच्याकडे चार आलीशान गाड्या आहेत. त्यांची काही ठिकाणी बेनामी मालमत्ता आहे. काही ठिकाणी स्वत:च्या नावावर घरे घेतली आहेत, असा आरोप करत चव्हाण यांनी यासंबंधीचे पुरावे सादर केले. दाऊदच्या गुंडाला ५० लाखांची बंदूक घेऊन देण्यातही त्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. हे सर्व पुरावे पोलीस आणि पालिका आयुक्तांना दिले जाणार असून आहेर यांच्यावर मोक्ककाअंतर्गत कारवाई झाली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – कल्याणच्या इराणी वस्तीमधील सोनसाखळी चोरट्यांना कारवासाची शिक्षा
नियमानुसार सहा महिन्यांच्यावर प्रभारी कार्यभार देता येत नाही. मात्र नियम डावलून त्यांना कार्यभार देण्यात आला आहे. अंपग नसलेल्यांना स्टॉलचे वाटप करण्यात आले असून एका स्टॉल पोटी दरमहा १० हजारांची वसुली आहेर हे काही माणसांमार्फत करीत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. गावदेवी मंडईमध्ये एक अधिकचा गाळा बांधून तो परस्पर विकण्याचे कामही करण्यात आले आहे. बीएसयुपी घरकुल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन सरकारच्या काळात देण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही त्याची चौकशी झालेली नाही, असा दावाही चव्हाण यांनी केला.