ठाणेकरांच्या पाणीपट्टी तसेच मालमत्ता करात मोठी वाढ करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला महापालिकेतील विरोधी बाकांवरील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकाच वेळी मांडलेल्या करवाढीच्या या वेगवेगळ्या प्रस्तावांना केराची टोपली दाखवावी, असा विचार सत्ताधारी शिवसेनेच्या गोटातही सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. नवी मुंबई महापालिका; तसेच अंबरनाथ-बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ठाणेकरांवर करवाढ लादणे योग्य होणार नाही, असा मतप्रवाह सत्ताधाऱ्यांच्या गोटात आहे. त्यामुळे पुढील तीन महिने तरी या प्रस्तावांना स्थगिती द्यावी, असे शिवसेनेच्या गोटात ठरते आहे.
स्थानिक संस्था कराचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणावर घटल्याने पालिकेच्या तिजोरीत खडखडाट  आहे. या कराच्या माध्यमातून महापालिकेने आगामी वर्षांत सुमारे ६५० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे.  येत्या एप्रिल महिन्यापासून स्थानिक संस्था करप्रणाली मोडीत काढण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.  या पाश्र्वभूमीवर आगामी वर्षांचा अर्थसंकल्प सादर करताना आयुक्त जयस्वाल यांनी वेगवेगळ्या करांमध्ये वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.