कल्याण- भारत जोडो यात्रे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महागडा टी शर्ट परिधान करुन पदयात्रेत सहभाग दाखविल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले होते. यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या कल्याणमधील पदाधिकाऱ्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या मुलाची महागडा टी शर्ट घातलेली छबी कल्याण शहरातील विविध फलकावर झळकवून भाजपच्या टीकेला जशास तसे उत्तर दिले आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर रविवार पासून तीन दिवसांच्या डोंबिवली, कल्याणच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मंत्री ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केल्याने काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकूर यांच्या मुलाचे महागडे टी शर्ट घातलेले फलक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाखाचा सूट घातलेल्या गणवेशाची छबी कल्याण शहराच्या विविध भागातील फलकावर झळकवून भाजपच्या टीकेला जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
कल्याण शहर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष सचिन पोटे, महिला ब्लाॅक अध्यक्षा विमल ठक्कर यांनी हे फलक लावले आहेत. केंद्र सरकारचा निषेध करणाऱ्या या फलकावर काँग्रेसच्या अन्य मोठ्या पदाधिकाऱ्याचे नाव नाही. त्यामुळे हात राखून ही टीका केली आहे का, असा प्रश्न भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, महिलांची असुरक्षितता असे अनेक विषय गंभीर होत चालले असताना या विषयावर लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने लोकांची दिशाभूल करणारे विषय पुढे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा काँग्रेसकडून निषेध केला जात आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिलाध्यक्ष विमल ठक्कर यांनी म्हटले आहे.
या फलकामध्ये काँग्रसने अनुराग ठाकूर यांच्या मुलाने महागडे विदेशी बनावटीचे टी शर्ट घातले असल्याचे दाखविले आहे. तसेच, ‘आपले ठेवायचे झाकून दुसऱ्याचे पाहायचे वाकून’ अशी कोपरखळी मारणारे शब्दप्रयोग करुन केंद्र सरकारचा निषेध केला आहे.
भारत जोडो यात्रेत टुकडे टुकडे गँगचा सहभाग, भारत तोडणारे भारत जोडो यात्रा काढत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी रविवारी डोंबिवलीत केल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप, केंद्र सरकारच्या भूमिकांचा निषेध केला आहे.