ठाणे : ठाण्यातील काँग्रेसचे पदाधिकारी गिरीश कोळी यांना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून झालेली मारहाण आणि ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याविरोधात दिलल्या तक्रारीनंतरही कोणतीही कारवाई झाली नसल्याने सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली.
हेही वाचा >>> ठाणे : जितेंद्र आव्हाडांनी मारहाण केल्याचे सांगण्यासाठी आरोपींना पाच खोक्यांची ऑफर; आनंद परांजपे यांचा गंभीर आरोप
काही दिवसांपूर्वी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना पत्र दिले होते. या पत्रात त्यांनी ठाणे महापालिकेचे वादग्रस्त साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यापासून कुटुंबियांना धोका असल्याचा आरोप केला होता. तसेच आहेर यांच्याविरोधात कारवाई करण्याची त्यांनी मागणीही केली होती. तर काँग्रेसचे पदाधिकारी गिरीश कोळी यांना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणातही कोणताही गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही. सोमवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची गडकरी रंगायतन येथे बैठक ठाण्यात पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची आयुक्तालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी याप्रकरणांमध्ये कारवाई करण्याची मागणी सिंग यांच्याकडे केली. तसेच कारवाई झाली नाहीतर आमच्या पद्धतीने पुढील पावले उचलली जातील असा इशाराही त्यांनी दिला.