ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने ठाणे महापालिका मुख्यालयासमोर बुधवारी कचरा टाकून आंदोलन केले. त्यापाठोपाठ काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही गुरूवारी पालिका मुख्यालयासमोर धरणे धरत ढोल वाजवून कचरा समस्येविरोधात अनोखे आंदोलन केले.ठाणे येथील सीपी तलाव परिसरातील कचरा हस्तांतरण केंद्रावर कचऱ्याचे ढीग लागले आहेत. त्यातून दुर्गंधी पसरत असून त्याचबरोबर आग लागून धुर परिसरात पसरत आहे. याचा त्रास होत असल्यामुळे स्थानिकांसह शिंदेच्या शिवसेनेने येथे कचरा टाकण्यास विरोध केला.
कचरा टाकण्यासाठी शहरात जागा नसल्यामुळे कचरा संकलन ठप्प झाले होते. पालिकेने आता आतकोली येथे कचरा नेण्यास सुरूवात केली असली तरी, घरोघरी कचरा संकलन पुर्णपणे क्षमतेने सुरू होऊ शकलेले नाही. यातूनच शहरातील रस्त्यांवर आणि गृहसंकुलांबाहेर कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. यामुळे पालिकेच्या कारभारावर नागरिकांकडून टिका होत असतानाच, आता राजकीय पक्षांनी आंदोलन सुरू केली आहेत. कचरा उचलला जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने ठाणे महापालिका मुख्यालयासमोर बुधवारी कचरा टाकून आंदोलन केले. त्यापाठोपाठ काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही गुरूवारी पालिका मुख्यालयासमोर धरणे धरत ढोल वाजवून कचरा समस्येविरोधात अनोखे आंदोलन केले.
काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे प्रभारी चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव संतोष केणी, ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी हातात विविध घोषणांचे फलक घेत सत्ताधारी तसेच प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच ढोल वाजवून मुख्यालयाचा परिसर दणाणून सोडला. तसेच ठाणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे, महिला अध्यक्ष स्मिता वैती, शिल्पा सोनोने, सेवादल अध्यक्ष रवी कोळी, प्रदेश पदाधिकारी राजेश जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुका होवोत अथवा न होवोत. काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत राहणार आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाचा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. तर, दहा दिवसापासून शहरातील कचरा पूर्णपणे उचलला गेला नाही. सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने दहा वर्षाच्या निविदेच नियोजन करणारे प्रशासन दहा दिवसाचा कचरा उचलू शकत नाही हे महापालिकेच तसेच सत्ताधाऱ्यांचेच अपयश आहे. गेली २५ वर्ष सत्ता असून कुठलीही ठोस उपाययोजना करू शकलेले नाही. त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार सुरू असून शहरातील कचराकोंडीचा प्रश्न न सुटल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. म्हणूनच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर ढोल वाजवत अनोखे आंदोलन करण्यात येत आहे, असे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.