कल्याण – कल्याणमधील काँग्रेसचे प्रदेश नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. कल्याण जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण, ठराविक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनाच मानाची पदे देण्याची स्पर्धा या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आम्ही शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य पॉली जेकब यांनी सांगितले.
मागील २० वर्षापासून आम्ही कल्याण जिल्हा काँग्रेस समितीमध्ये निष्ठेने सक्रिय पध्दतीने काम करत आहोत. पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही वेळोवेळी काँग्रेस पक्षासाठी, काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम केले. पक्षाचे मोर्चे, आंदोलनात सहभाग घेतला. आम्हाला कधीही स्थानिक नेतृत्वाने मानाची पदे दिली नाहीत.
स्थानिक पदाधिकाऱ्यांभोवती रुंजी घालणाऱ्यांना पालिकेत समित्या, स्थायी समिती पदी वर्णी लावली. हे राजकारण संपणे कठीण आहे. आता तर कल्याण जिल्हा काँग्रेस समितीत कोणालाही दाद दिली जात नाही. एककल्ली स्थानिक कारभार चालविला जात आहे. या कारभाराला कंटाळून आम्ही शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे प्रदेश काँग्रेस नेते पाॅली जेकब यांनी सांगितले.
खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी कल्याण जिल्हा काँग्रेस नेत्यांना मुंबईतील कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश दिला. खासदार शिंदे यांनी प्रत्येकाच्या हाती शिवसेनेचा झेंडा देऊन त्यांचे स्वागत केले आणि प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची कदर केली जाईल, त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असे आश्वासन दिले.
प्रदेश नेते पाॅली जेकब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय मानवी हक्क आयोग कल्याण विभागाचे अध्यक्ष राजकुमार हिरावत, विद्यार्थी विभागाचे सन्नी ॲन्थोनी, महासचिव सुनील चव्हाण, सल्लागार ॲड. नित्यानंद नायर, युवक काँग्रेस महासचिव संतोष शर्मा, प्रदेश काँग्रेस राष्ट्रीय मानवी हक्क आयोग प्रदेश सचिव स्टिफन हिवाळे, विजू अब्राहम अशा शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. येत्या पालिका निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असे पाॅली जेकब यांनी सांगितले.