उल्हासनगरः सत्तेचे विकेंद्रीकरण हे कॉंग्रेसचे धोरण होते. मात्र सत्ता केंद्रीत करून ठेवणे हे मोदी सरकारचे धोरण आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या अधिकारावर गदा आणली असून राज्यात प्रशासक राजवट सुरू ठेवली आहे. त्यांच्या सत्तेच्या हव्यासापोटीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. उल्हासनगर दौऱ्यावर असताना सपकाळ यांनी हे वक्तव्य केले.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नुकतेच उल्हासनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उल्हासनगरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सत्तेवर बसलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागले आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये कर्ज माफी देवू असे आश्वासन देत महायुतीने शेतकऱ्यांची मते घेतली आणि सत्ता मिळवली. मात्र आता ३१ मार्चपूर्वी पीककर्ज भरा. कोणतीही कर्जमाफी मिळणार नाही, असे मुजोर वक्तव्य राज्याचेे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. अजित पवार यांचे हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. दादा क्या हुआ तेवा वादा असा संतप्त सवाल यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांप्रमाणेच लाडक्या बहिणींनाही योजनेतून बाद केले. महिलांना २१०० रूपये मिळण्याची आशा होती, असेही सपकाळ म्हणाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांच्या धोरणांमुळे देशात मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग वाढला होता. मात्र मोदी सरकारच्या धोरणांमुळे गेल्या १० वर्षाच्या काळात मध्यवर्गाचे कंबरडे मोडले. उल्हासनगरसारख्या शहरातील उद्योग व्यवसायांवरही त्यामुळे संकट आल्याचे सपकाळ यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष संघटन एड गणेश पाटील, उल्हासनगर शहर जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.