लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : पोलीस ठाण्यात आलेले प्रकरण मिटविण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदार गणेश राठोड याला त्याच्या साथिदारासह ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. गणेश राठोड हा शीळ डायघर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. या प्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मैत्रिणीने एका अर्थ पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून महागडी दुचाकी खरेदी केली होती. परंतु तक्रारदार यांना पैशांची गरज असल्याने तिने ही दुचाकी विक्री करण्याचे ठरविले. तिने जुन्या वस्तू खरेदी – विक्री करणाऱ्या ॲपद्वारे दुचाकी विक्रीची जाहिरात केली होती. ही जाहिरात शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दुचाकी डिलरने पाहिली होती. ही दुचाकी त्याने विकत घेण्याचे ठरविले. त्यानुसार, त्या मुलीने ही दुचाकी त्या डीलरला विक्री केली होती. परंतु दुचाकी विक्रीचे ना हरकत प्रमाणपत्र दिले नव्हते. त्यामुळे त्या डीलरने त्याचे पैसे पुन्हा मागण्यास सुरुवात केली.

डीलर धमकी देत असल्याने तक्रारदार यांनी ११२ या पोलीस नियंत्रण क्रमांकाला संपर्क साधून मदत मागितली होती. त्यानंतर शीळ डायघर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तेथे गेले. तसेच तक्रारदाराला २० दिवसांत डीलरचे पैसे पुन्हा देण्याची मुदत दिली. काही दिवसांनी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार गणेश राठोड यांनी या प्रकरणाबाबत तक्रारदार यांना संपर्क साधला. हे प्रकरण मिटविण्यासाठी हवालदार गणेश राठोड याने तक्रारदार यांच्याकडून २० हजार रुपये लाचेची मागणी केली.

१६ एप्रिलला तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली. विभागाने या प्रकरणाचा तपास केला असता, हवालदार गणेश राठोड यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. सापळा कारवाई दरम्यान गणेश राठोड याने ‘आठ हजार रुपये दे आणि प्रकरण मिटवून टाक’ असा सल्ला तक्रारदाराला दिला. त्यानंतर तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले.

तक्रारदार याला गणेश राठोड याने शीळफाटा- महापे मार्गावरील रुद्र पान शॉप या टपरीवरील खासगी व्यक्ती आकाश गुप्ता याच्याकडे पैसे देण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आकाश गुप्ता आणि त्यानंतर गणेश राठोड या दोघांनाही लाचेप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी शीळ-डायघर पोलीस ठाण्यात गणेश राठोड आणि आकाश गुप्ता या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.