कल्याण – एका वाहतूकदाराकडून ५०० रूपयांची लाच घेताना कल्याण वाहतूक शाखेतील एका हवालदाराला शहाड येथील वाहतूक पोलीस चौकीत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी रंगेहाथ पकडले. या वाहतूक हवालदारा विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रवीण गुलाब गोपाळे (४१) असे वाहतूक हवालदाराचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश जागडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस ठाण्यातील तक्रारीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे, की तक्रारदार हे वाहतूकदार आहेत. त्यांचा कल्याण परिसरात माल वाहतुकीचा व्यवसाय आहे. या कामासाठी ते पिकअप टेम्पो वापरतात. हा टेम्पो कधीही व कुठेही न अडविण्याकरिता वाहतूक हवालदार प्रवीण गोपाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे दर महिना ७०० रूपये लाच देण्याची मागणी केली होती. लाच दिली नाहीतर प्रत्येक चौकात हे मालवाहू वाहन अडवून कारवाई करणार असल्याची तंबी दिली होती.

आपण कोणतेही नियमबाह्य काम करत नाही, तरी हवालदार आपल्याकडे पैसे मागत असल्याने याप्रकरणी वाहतूकदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत हवालदार गोपाळे लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले होते. तडजोडीअंती हवालदार प्रवीण गोपाळे यांनी वाहतूकदाराकडून दरमहा ५०० रूपये स्वीकारण्याचे कबुल केले होते. पहिला हप्ता म्हणून मंगळवारी संध्याकाळी ५०० रूपये स्वीकारण्याचे हवालदार गोपाळे यांनी मान्य केले. शहाड येथील वाहतूक पोलीस चौकीत मालवाहतूकदाराकडून ५०० रूपयांची लाच स्वीकारताना गोपाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

कल्याणमध्ये आठवडाभरात झालेली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही दुसरी कारवाई आहे. कल्याण डोंबिवली पालिकेतील बाजार व परवाना विभागातील लिपिक प्रशांत धिवर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दीड लाखाची लाच घेताना एका व्यावसायिकाकडून रंगेहाथ पकडले होते.

Story img Loader