रस्त्यावरील वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे ठाणेकरांचा श्वास कोंडला जात असतानाच, आता बांधकामाच्या कचऱ्यानेही नागरिकांची घुसमट वाढवली आहे. शहरात वेगाने निर्माण होणाऱ्या गृहप्रकल्पांतून निर्माण होणाऱ्या बांधकाम कचऱ्यामुळे गेल्या पाच वर्षांत शहरातील धुळीच्या प्रदूषणात दुपटीने वाढ झाल्याचा धक्कादायक अहवाल महापालिकेच्या पर्यावरण विभागाने दिला आहे. तसेच हा कचरा ठाण्यातील खाडीकिनारी आणि महामार्गाच्या कडेला रिकामा केला जात असल्याने तिवरांचे अस्तित्वही धोक्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे.  
मुंबई, नवी मुंबई यासारख्या शहरातही बांधकामांमधून निघणारा शेकडो मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावणारी कोणतीही ठोस यंत्रणा अद्याप उपलब्ध नाही. ठाणे, नवी मुंबई या दोन्ही शहरांमधील बरीचशी जमीन दलदलीची असल्याने भरणीसाठी या बांधकाम कचऱ्याचा सर्रास वापर केला जातो. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढत असतानाच नव्या गृहप्रकल्पांच्या बांधकामामुळे धुळीचे ढग शहरावर घोंघावू लागले आहेत. ठाण्याच्या पश्चिमेकडील बाजूस मोठय़ा प्रमाणावर औद्योगिक कंपन्यांचे विस्तीर्ण भूखंड आहेत. यापैकी काही भूखंडांवर बंद पडलेल्या कंपन्यांच्या इमारतींचे सांगाडे उभे आहेत. राज्य सरकारने औद्योगिक जमिनींचा रहिवास विभागात बदल करण्यास परवानगी दिल्याने अशा भूखंडांवर गृहप्रकल्प उभारणीला कमालीचा वेग आला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गालगत उभे राहिलेले काही विस्तीर्ण असे मॉल अशाच वापर-बदलाचे फलित मानले जातात, मात्र विकासाच्या या प्रक्रियेत निघणाऱ्या बांधकामाच्या शेकडो मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणा उपलब्ध नसल्याने महामार्गाच्या कडेला साचणारे डेब्रिजमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याचा निष्कर्ष विभागाने काढला आहे.
शहरातील धोकादायक इमारतींची संख्याही मोठी आहे. अशा इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी समूह विकास योजनेसारखे प्रकल्प राबविण्याचे बेत एकीकडे आखले जात असताना मोठय़ा प्रमाणावर निर्माण होणाऱ्या बांधकाम कचऱ्याच्या विल्हेवाटीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, अशा सूचनाही पर्यावरण विभागाने शहर विकास विभागाला दिल्या आहेत.  
जयेश सामंत, ठाणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्वसन, घशाचे विकार वाढण्याची भीती
रस्त्याच्या शेजारी टाकण्यात येणाऱ्या या कचऱ्यामुळे धूळ निर्माण होऊन शहरी वसाहतींमध्ये हवेचे प्रदूषण वाढले आहे, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. याची परिणती ठाणेकरांमध्ये श्वसन आणि घशाच्या विकारांत वाढ होण्यात झाल्याचे पर्यावरण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. याबाबतची आकडेवारी मात्र विभागाकडे उपलब्ध नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction debris increased dust pollution in thane