कल्याण: डोंबिवलीतील महाराष्ट्रनगरमध्ये एका विकासकाने भूमि अभिलेख विभागाच्या बनावट मोजणी नकाशाच्या आधारे कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाकडून दोन वर्षापूर्वी इमारत बांधकाम परवानगी घेतल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाने ही बांधकाम परवानगी रद्द केली. संबंधित विकासक आणि वास्तुविशारदावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनयमानुसार बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद बिल्डर्सचे विनोद किसन म्हात्रे, वास्तुविशारद धीरज भारत पाटील यांच्यावर नगररचना विभागाचे नगररचनाकार शशिम केदार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जानेवारी २०२१ ते आतापर्यंत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी सांगितले, विकासक विनोद म्हात्रे, वास्तुविशारद धीरज पाटील यांनी आपसात संगनमत करून मौजे गावदेवी (महाराष्ट्रनगर, कांचन बंगला शेजारी) येथील सर्वे क्रमांक १५८ (जुना) ७७ (नवीन) हिस्सा क्रमांक चार, पाच या भूखंडावर सुधारीत बांधकाम परवानगीसाठी नगररचना विभागात कागदपत्र दाखल केली होती. या कागदपत्रांमध्ये भूमि अभिलेख विभागाने २०१४ मध्ये जमीन मोजणी केलेला नकाशा जोडण्यात आला होता. या नकाशाची पालिकेने कल्याणच्या भूमि अभिलेख विभागात सत्यता तपासली. अशाप्रकारचा मोजणी नकाशा भूमि अभिलेख विभागाने दिली नसल्याचे उप अधीक्षक भूमि अभिलेख यांनी पालिकेला कळविले.
हेही वाचा… ठाणे पोलीस दलात मोठे फेरबदल; सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
पालिकेची दिशाभूल, फसवणूक करून बांधकाम परवानगी मिळविण्याचा प्रयत्न केला म्हणून पालिकेने विकासक म्हात्रे, वास्तुविशारदा विरुध्द पोलिसांत तक्रार केली. वास्तुविशारद धीरज पाटील यांनी सांगितले, यापूर्वीच्या वास्तुविशारदाने या इमारतीचा आराखडा तयार केला होता. या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत. विकासकाने या जमिनीविषयी महसूल विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
काय आहे प्रकरण
डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील महाराष्ट्रनगर मधील खासगी आणि काही गुरचरण जमिनीवर विनोद म्हात्रे यांनी पालिकेकडून सहा माळ्याच्या इमारतीची बांधकाम मंजुरी घेतली. पालिकेला अंधारात ठेऊन या इमारतीवर बेकायदा पाच वाढीव माळे बांधले. बनावट कागदपत्र दाखल करून पालिका आणि संबंधित घर खरेदीदारांची फसवणूक केली म्हणून विनोद बिल्डर्सची बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी आमदार गणपत गायकवाड यांनी केली. नगररचना विभागाच्या साहाय्यक संचालक नगररचनाकार दीक्षा सावंत यांनी आयुक्तांच्या आदेशावरुन ही परवानगी रद्द केली. या इमारतीचा काही भाग गुरचरण जमिनीत आहे. मोजणी नकाशात ही जागा खासगी दाखविण्यात आली. या बेकायदा इमारतीत सुमारे २० हून अधिक कुटुंब राहतात. माजी नगरसेवक रमेश पद्माकर म्हात्रे यांनीही या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जमीन सरकार जमा करण्याची मागणी केली आहे.