डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथील खाडी किनारी भागातील जुनाट खारफुटीची झाडे तोडून एका आठ माळ्याच्या बेकायदा इमारतीचे बांधकाम भूमाफियांनी पूर्ण केले आहे. महसूल, पालिका अतिक्रमण नियंत्रण आणि ह प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांचे या खारफुटी तोडीकडे लक्ष नसल्याने पर्यावरणप्रेमी नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
डोंंबिवली पश्चिमेत कुंभारखाणपाडा, देवीचापाडा, मोठागाव रेतीबंदर, कोपर आणि आयरे हा एकमेव हरितपट्टा शिल्लक आहे. या हरितपट्ट्यात भूमाफियांनी खाडी किनारच्या भागात माती, दगडाचे भराव देऊन बेसुमार बेकायदा चाळी उभारणीचे काम सुरू केले आहे. ह प्रभाग हद्दीत उल्हास खाडी किनाऱ्या लगतच्या कुंभारखाणपाडा भागात यापूर्वीच १० बेकायदा इमारतींचा गृहप्रकल्प सुरू आहे. १२ एकर जागेत काटईच्या एका इसमाने बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू केले आहे, अशा तक्रारी आहेत.
हेही वाचा… कल्याणमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरूणाची अकरा लाखाची फसवणूक
खंडोबा मंदिराच्या मागील बाजूस खारफुटीची जुनाट झाडे आहेत. विविध पक्ष्यांचा अधिवास या झाडांवर होता. निसर्ग छायाचित्रकार यांचे हे भ्रमंतीचे ठिकाण आहे. भूमाफियांनी या भागातील खारफुटीची जुनाट झाडे तोडून टाकली आहेत. या मोकळ्या जागेवर पालिकेला अंधारात ठेऊन आठ माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे. खाडी किनारी निसर्गरम्य वातावरणात ही इमारत असल्याने याठिकाणी सदनिका खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना भूमाफिया या इमारतीला महारेराचा नोंदणी क्रमांक, ही इमारत कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या घेऊन उभारण्यात आली आहे, अशी खोटी माहिती देऊन दिशाभूल करत आहेत, अशा तक्रारी आहेत.
या इमारतीच्या चारही बाजुने बांधकाम पूर्ण होईपर्यंत हिरवी जाळी लावण्यात आली होती. ती जाळी आता सदनिका खरेदीदारांनी या इमारतीकडे आकर्षित व्हावे यासाठी काढून टाकण्यात आली आहे. पावसाळ्यात कुंभारखाणपाडा खाडी किनारा परिसरात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसतो. अशा जागेत या इमारतींची उभारणी करून भूमाफियांंनी नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू केली आहे.
हेही वाचा… नगररचना अधिकाऱ्यांची ‘एसआयटी’कडून चौकशी; डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरण
प्रभागातील बेकायदा बांधकामांवर नजर ठेवण्यासाठी पालिकेने बीट मुकादम नियुक्त केले आहेत. त्यांच्यावर कनिष्ठ अभियंता नियंत्रक म्हणून काम करतो. मग ह प्रभागातील बीट मुकादम यांना कुंभारखाणपाडा भागात खारफुटी तोडून उभी राहत असलेली बेकायदा बांधकामे दिसत नाहीत का, असे प्रश्न पर्यावरणप्रेमी नागरिक करत आहेत. ह प्रभाग कार्यालयाकडून हरितपट्ट्यातील आणि प्रभाग हद्दीतील राहुलनगर, मोठागाव, नवापाडा, कोपर भागातील बेकायदा बांधकामांवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारदारांच्या तक्रारी आहेत.
कुंभारखाणपाडा खाडी किनारी सर्वाधिक बेकायदा चाळींची बांधकामे सुरू आहेत. देवीचापाडा भागातील मेंग्या बाबा मंदिराजवळील खारफुटीची जुनाट झाडे रात्रीतून तोडून तेथे रात्रीतून मातीचे भराव टाकले जात आहेत. पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा, देवीचापाडा, मोठागाव, कोपर, आयरे हरितपट्ट्याचा पाहणी दौरा करण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.