डोंबिवली- दिवा रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक एकच्या बाजुला गृह फलाटाची (होम प्लॅटफाॅर्म) उभारणी सुरू केली आहे. हे काम अतिशय वेगाने पूर्ण केले जात आहे. त्यामुळे येत्या काळात दिवा लोकल सुरू करण्याच्या प्रशासनाच्या हालाचाली आहेत का, याविषयी तर्क काढले जात आहेत.
दिवा शहर परिसराचे मागील १० वर्षाच्या काळात झपाट्याने नागरीकरण झाले आहे. दिवा भागातील लोकवस्ती मुंब्रा, शिळफाटा चौकापर्यंत विस्तारली आहे. या भागातील नोकरदार, व्यावसायिक, कष्टकरी वर्ग मुंबईला जाण्यासाठी दिवा रेल्वे स्थानकाचा वापर करतो. २० वर्षापूर्वी दिवा रेल्वे स्थानकात चार ते पाच प्रवासी फलाटावर उतरत होते. तीच प्रवासी संख्या आता डोंबिवली रेल्वे स्थानकातील गर्दीसारखी झाली आहे. मुंबईतून भरुन येणाऱ्या संध्याकाळच्या लोकल दिवा रेल्वे स्थानकात खाली होतात, असे सध्याचे चित्र आहे.
हेही वाचा >>>भाजपचे लक्ष्य १५२ जागांचे, महाविजयाचा निर्धार : शिवसेनेशी भावनिक, राष्ट्रवादीशी राजकीय मैत्री – फडणवीस
दिवा रेल्वे स्थानकातून कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. वसई, डहाणूकडे जाणाऱ्या शटल याच स्थानकातून सुटतात. दिवा मध्य रेल्वे स्थानक मार्गावरील मोठे वाहतूक केंद्र झाले आहे. या रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेऊन रेल्वेने भविष्यकालीन विचार करुन या स्थानकात फलाट क्रमांक एकच्या बाजुला नवीन गृह फलाट बांधणीचे काम जोमाने सुरू केले आहे.
कसारा,कर्जत, कल्याण, टिटवाळा, बदलापूरकडून प्रवाशांनी तुडूंब भरुन येणाऱ्या लोकल दिवा रेल्वे स्थानकात थांबल्या तरी दिवा स्थानकातील प्रवाशांना अलीकडे जागा मिळत नाही. जलदगती लोकलबाबतीत अशीच परिस्थिती आहे. दिव्यातील प्रवाशांना सकाळी रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढून दिले नाही की हेच प्रवासी मुंबईतून येताना दरवाजा अडून उभे राहतात. सकाळच्या लोकलमध्ये चढून न दिल्याचा वचपा संध्याकाळी काढतात. संध्याकाळच्या वेळेत कामावरुन परतत असताना दिव्याताली प्रवासी मुद्दाम दरवाजा अडून उभा राहतो. तो घाटकोपर, मुलुंड, ठाणे स्थानकात बदलापूर, टिटवाळा, कर्जत, कसाराकडे जाणाऱ्या प्रवाशांना मुद्दाम चढून देण्यात अडथळा निर्माण करतो. या प्रकारामुळे अनेक वेळा लोकलमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत.
हेही वाचा >>> ‘५० पैकी एकाचाही पराभव होऊ देणार नाही’
या सगळ्या परिस्थिताचा विचार करुन येत्या काळात दिवा स्थानकातून दिवा लोकल सोडण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाचे असण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. रेल्वे अधिकारी मात्र याविषयी सध्या काहीही बोलण्यास तयार नाहीत. फलाट बांधणीचे काम सुरू आहे. पुढे काय नियोजन आहे याची माहिती आम्हाला नाही, असे उपस्थित अधिकाऱ्याने सांगितले.
( दिवा रेल्वे स्थानकात गृह फलाट उभारणीचे काम.)