डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून येजा करणाऱ्या प्रवाशांचे जिना चढ उतर करण्याचे दुष्टचक्र आता संपुष्टात येणार आहे. ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकात सरकता जिना उभारणीचे काम मध्य रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. येत्या सहा ते सात महिन्यात हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्याने दिली.
डोंबिवली रेल्वे स्थानका जवळील ठाकुर्ली हे महत्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील तुफान गर्दीत सकाळच्या वेळेत लोकलमध्ये चढता येत नाही. डोंबिवलीतील अनेक प्रवासी विशेष करुन पेंडसेनगर, सारस्वत काॅलनी, एमआयडीसी, ठाकुर्ली, नेहरु मैदान भागातील अनेक नोकरदार सकाळी ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात गर्दीचे प्रमाण कमी असते. ९० फुटी रस्ता भागातील नवीन वस्तीमधील बहुतांशी नोकरदार ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून येजा करतो. या वाढत्या वस्तीमुळे यापूर्वी ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून सुमारे ४० ते ५० हजार प्रवासी करत होते. ही प्रवासी संख्या आता सुमारे एक लाखाच्या पुढे गेली आहे.
या वाढत्या प्रवासी संख्येमुळे ठाकुर्ली रेल्वे स्थाकातील तिकीट विक्रीतून मिळणारे रेल्वेचे उत्पन्न वाढले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकुर्ली रेल्वे स्थानकात उद्वाहन, सरकता जिना सुविधा देण्याची मागणी मागील पाच ते सहा वर्षापासून प्रवाशांकडून केली जात आहे. आतापर्यंत भिकारी, गर्दुल्ले यांचे आश्रयस्थान असलेले स्थानक म्हणून ठाकुर्ली स्थानकाची ओळख होती. ठाकुर्ली स्थानकात नवीन फलाटाची उभारणी झाल्यानंतर या स्थानकाचा चेहरामोहरा बदलला आहे. याठिकाणी सतत पोलीसांची गस्त असते.वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करुन रेल्वेने ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानक भागात तिकीट खिडकी जवळ सरकता जिना उभारणीचे काम गेल्या पंधरा दिवसापासून सुरू केले आहे. अनेक प्रवाशांना या भागात खड्डे नक्की कोणत्या कारणासाठी खोदले आहेत याची माहिती नाही. या खड्डयांमध्ये रात्रीच्या वेळेत अंधारात पादचारी, प्रवासी पडण्याची भीती प्रवासी व्यक्त करतात. खड्डे खोदल्यानंतर याठिकाणी आवश्यक यंत्र सामुग्री येणार आहे. त्यामुळे हा भाग बंदिस्त करता येत नाही. हा भाग मोकळा ठेवण्यात आला आहे. या भागात सरकता जिना उभारणीचे काम सुरू झाल्यानंतर काही दिवस जिना भागातील परिसर प्रतिबंधित केला जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.
सरकत्या जिन्यामुळे जिन्यावरील ५० ते ६० पायऱ्या चढून जाण्याचा प्रवाशांचा त्रास वाचणार आहे. तसेच ठाकुर्ली, डोंबिवलीतील काही नागरिक रेल्वे जिन्यातून ठाकुर्ली पश्चिमेतून गणेशनगर, कुंभारखाणपाडा, रेल्वे मैदान, खाडी किनारा भागात सकाळ, संध्याकाळ फिरण्यासाठी जातात. सरकत्या जिन्यामुळे ज्येष्ठ नागरिक, वृध्द यांना ठाकुर्ली पूर्व, पश्चिम भागात येजा करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. नोकरदार वर्गाला सकाळच्या वेळेत घाईत जिने चढून लोकल पकडण्याचा त्रास वाचणार आहे. महिलांची यात सर्वाधिक सोय होणार आहे, असे प्रवाशांनी सांगितले.
हेही वाचा: कल्याण: खासगी विमा कंपनीच्या नावाने नोकरदाराची ४५ हजार रुपयांची फसवणूक
” ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील प्रवासी संख्या वाढली आहे. प्रत्येक स्थानकात सरकत्या जिन्याची सुविधा आहे. त्याप्रमाणे ठाकुर्ली स्थानकात ही सुविधा देण्याची मागणी दोन वर्षापासून प्रवासी करत होते. त्याची आता अंमलबजावणी सुरू झाली आहे. याचे समाधान वाटते.”- मंदार अभ्यंकर, प्रवासी, ठाकुर्ली