लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली: डोंबिवलीत महारेरा घोटाळ्यातील ६५ बेकायदा इमारतींची चौकशी विशेष तपास पथक, ईडीकडून सुरू आहे. पालिका प्रशासन आणि तपास पथकांचा थोडाही धाक आता भूमाफियांना राहिला नाही. बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागातील चिंचोड्याचा पाडा येथे एका भूमाफियाने नागरिकांचा येण्याचा जाण्याचा रस्ता बंद करुन भर रस्त्यात एक चार माळ्याच्या बेकायदा इमारतीची उभारणी केल्याने परिसरातील रहिवासी अस्वस्थ आहेत.

डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील चिंचोड्याचा पाडा येथील बाळकृष्ण सुपर मार्केट मयूर सोसायटीच्या बाजुला ही चार माळ्याची बेकायदा इमारत भूमाफियांनी उभारली आहे. या मोकळ्या जागेचा वापर परिसरातील मुलांना खेळण्यासाठी होत होता. हा वर्दळीचा अंतर्गत रस्ता असल्याने या भागात इमारत, चाळीचे बांधकाम होणार नाही असे रहिवाशांना वाटले होते. परिसरातील रहिवासी बेकायदा इमारत उभारलेल्या इमारतीच्या जागेतून आपल्या सोसायट्यांच्या आवारात येजा करत होते. मुलांना शाळेत नेणाऱ्या मिनी बस या रस्त्यावरुन ये-जा करतात.

आणखी वाचा-ठेकेदारांच्या मनमानीमुळे कल्याण-डोंबिवली पालिकेत नालेसफाई कामांची नव्याने निविदा प्रक्रिया

अशा रस्त्यांवर पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येणार नाही, अशा पध्दतीने भूमाफियांनी वर्दळीचा, सोसायट्यांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद करुन बिनधास्तपणे ही बेकायदा इमारत ठोकली आहे. या इमारतीची पालिका आयुक्तांकडे तक्रार केली तर भूमाफियांकडून आपल्याला त्रास दिला जाईल या विचाराने चिंचोड्याचा भागातील एकही रहिवासी या बेकायदा इमारतीच्या विरोधात तक्रार करण्यास पुढे येत नाही. काही दुर्घटना घडल्यास या इमारतीच्या ठिकाणी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन जाण्यास जागा नाही.

अशा तुटपुंज्या जागेत चार माळ्याच्या बेकायदा इमारत उभारणीचे काम माफियांनी धाडसाने केले आहे. या इमारत उभारणीसाठी पालिकेतील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने वित्त पुरवठा केला असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. हा अधिकारी दर दोन दिवसांनी या बांधकामाच्या ठिकाणी उपस्थित असतो, असेही रहिवाशांनी सांगितले. या बेकायदा इमारतीला चारही बाजुने सहा मीटरचे सामासिक अंतर नाही. या इमारतीच्या तळ मजल्याला वाहनतळाची सुविधा आहे. परंतु, ही वाहने सोसायटी वाहनतळावरुन बाहेर काढताना, आत नेताना या भागातील येजा करणाऱ्या वाहनांना अडथळा ठरणार आहेत.

आणखी वाचा- डोंबिवलीतील ठाकुर्ली, कोपर उड्डाण पुलांवरील पथदिवे बंद

या बेकायदा बांधकामाविषयी वरिष्ठ पालिका अधिकारी, ह प्रभागातील कर्मचारी अनभिज्ञ आहेत. नगररचना विभागातील अधिकाऱ्याला या बांधकामा संदर्भात विचारणा केली. त्यांनी अशाप्रकारच्या इमारतीला आम्ही परवानगी दिलेली नाही. ह प्रभागातील अधिकाऱ्याने या इमारतीची पाहणी करुन संबंधिताला नोटीस देऊन ही इमारत नियमबाह्य असेल तर ती जमीनदोस्त करण्याची कारवाई केली जाईल, असे सांगितले. आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पुढाकार घेऊन ही बेकायदा इमारत भुईसपाट करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी चिंचोड्याचा पाडा भागातील नागरिकांकडून केली जात आहे. रस्ता अडवून बेकायदा इमारत उभी राहत असताना ह प्रभागातील बीट मुकादम, कनिष्ठ अभियंता, साहाय्यक आयुक्तांना ही इमारत दिसली कशी नाही का, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction of illegal building by blocking road in chinchodya pada in dombivli mrj