डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसी भागातील आजदे, सागर्ली गाव बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखले जाते. या भागातील राजकीय भूमाफियांनी एमआयडीसीचे कंपन्यांसाठीचे राखीव भूखंड, पालिकेचे आरक्षित भूखंड हडप करून टोलेजंंग बेकायदा इमारती गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत उभारल्या आहेत. ही भूक भागत नाही म्हणून भूमाफियांनी आजदे गावातील नागरिकांचे येण्या-जाण्याचे मार्ग बंद करून तेथे टोलेजंग इमारती उभारण्याचा सपाटा लावला आहे.

या भूमाफियांची स्थानिक पातळीवर दहशत असल्याने स्थानिक रहिवासी या बेकायदा बांधकामांविषयी तक्रारी करत नाहीत. आजदे गावात घरडा सर्कल येथून कमानीतून हनुमान मंदिर रस्त्याने टिळकनगर शाळा ते मिलापनगर रस्त्याने जाताना हनुमान मंंदिराच्या पुढे उजव्या बाजूला रहिवाशांचा जुना येण्याचा जाण्याचा रस्ता होता. या भागातून मोटारी, दुचाकी, परिसरातील नागरिक या रस्त्यावरून येजा करत होते. गेल्या काही महिन्यांंपासून या रस्ते मार्गात भूमाफियांनी आजुबाजूच्या इमारतींचा विचार न करता, दोन इमारतींमध्ये सामासिक अंंतर न ठेवता तुटपुंज्या जागेत बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू केले आहे. मुख्य वर्दळीचा रस्ता बंद करून ही बेकायदा इमारत उभारण्यात येत असल्याने रहिवाशांना आता वळसा घेऊन घरडा सर्कल किंवा मुख्य रस्त्यावर यावे लागते, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या.

हेही वाचा – ठाणे : पिकवलेला भाजीपाला ‘ई कार्ट’द्वारे घरपोच

स्थानिक राजकीय मंडळींचा या बेकायदा बांधकामात सहभाग आहे. त्यामुळे उघड बोलण्यास कोणीही रहिवासी तयार नाही. आजदे भाग कल्याण डोंबिवली पालिका आणि एमआयडीसीच्या अखत्यारित येतो. एमआयडीसीपासून हाकेच्या अंतरावर हे बेकायदा बांधकाम सुरू आहे. या बेकायदा बांधकामाच्या बाजूला एक सात माळ्याचा बेकायदा टोलेजंंग इमारतीचा सांगाडा माफियांनी बांधून ठेवला आहे. दिवसाढवळ्या ही कामे सुरू असताना पालिका आणि एमआयडीसी अधिकारी या बेकायदा बांधकामांवर कारवाई का करत नाहीत, असे प्रश्न रहिवाशांनी केले आहेत.

एमआयडीसीत दरवर्षी कंपन्यांंमध्ये स्फोट होत आहेत. या भागातील बफर झोन यापूर्वीच्या राजकीय मंडळींनी हडप केला. कंपन्यांचे ५०० हून अधिक भूखंड चाळी, इमारती बांधून माफियांनी गिळंकृत केले आहेत. आता नागरिकांचे रस्ते, सुविधा भूखंड माफियांकडून हडप केले जात असताना पालिका, एमआयडीसी यंत्रणा याविषयी मूग गिळून गप्प असल्याने उद्योजक, व्यावसायिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी पालिका हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम होणार नाही असे हमीपत्र चार महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयात दिले आहे. तरीही पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे थांंबत नसल्याने आयुक्तांच्या हमीपत्राला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या बेकायदा बांधकाम प्रकरणी एमआयडीसी अधिकाऱ्यांना संपर्क साधला, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा – VIDEO : ठाण्यात वाऱ्याच्या वेगामुळे जाहिरात फलक पडण्याची भिती, पालिकेने फलक काढण्याबाबत बजावली नोटीस

आयदे गाव हद्दीत घरडा सर्कल ते टिळकनगर शाळा दरम्यानच्या रस्त्यावर बेकायदा इमारत बांधकाम सुरू असेल तर त्या बेकायदा बांधकामाची माहिती घेऊन ते तात्काळ जमीनदोस्त करण्याची कारवाई केली जाईल. – भारत पवार, साहाय्यक आयुक्त, ई प्रभाग, डोंबिवली.