डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी हद्दीतील घरडा सर्कल जवळील आजदे गावात दत्त मंदिरासमोरील जयराम गायकर इमारतीच्या पाठीमागील बाजूस इमारतींच्या मोकळ्या जागेत आटोपशीर जागेत घाईघाईने बेकायदा इमारत उभारणीचे काम भूमाफियांनी सुरू केले आहे. या बांधकामाला विरोध करणाऱ्या इमारतीमधील नागरिकांना भूमाफियांनी दमदाटी केली आहे.
यासंदर्भात पालिकेच्या ई प्रभागात, एमआयडीसी कार्यालयात तक्रारी करण्यात आल्या आहेत. पण त्याची दखल घेतली जात नाही, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. उलट अधिकाऱ्यांकडून आपली नावे भूमाफियांना सांंगितली जातील या भीतीने कोणीही नागरिक स्वताचे नाव उघड करण्यास तयार नाही. गेल्या पंधरा दिवसापूर्वी एमआयडीसी अधिकाऱ्यांनी एमआयडीसीतील टिळकनगर शाळेसमोरील एक बेकायदा इमारत सील करण्याचे नाटक केले आहे, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या.
हेही वाचा >>> मंत्रालयात नोकरी लावतो सांगून कल्याणमधील चार जणांची फसवणूक
पालिका, एमआयडीसी अधिकारी आपली जबाबदारी झटकून या बेकायदा बांधकामांना अभय देतात. त्यामुळे भूमाफियांनी बेकायदा बांधकाम करण्यास बळ मिळत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. जयराम गायकर इमारतीच्या पाठीमागील बाजूस दोन ते तीन इमारतींच्या मोकळ्या जागेत, गटार, मल, जलनिस्सारण वाहिन्या गेलेल्या भागातून भूमाफियांनी इमारतीला कोणतेही सामासिक अंतर न ठेवता, इतर इमारतींच्या घरात अंधार पसरेल, सांडपाणी वाहून जाण्यासाठी जागा न ठेवता, अशा पध्दतीने आजदे गावात दत्तमंदिरासमोरील भागात बेकायदा इमारतीचे काम सुरू केले आहे.
या बेकायदा इमारतीच्या बांधकामासाठी पालिकेच्या जलवाहिनीतून चोरून पाणी पुरवठा वापरला जात आहे. या नवीन बांधकामाच्या ठिकाणी जाण्यासाठी अरूंद बोळातून जावे लागते. या भागात काही दुर्घटना घडली तर तेथे रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन जाणार नाही, असे तक्रारदारांनी सांगितले.
हेही वाचा >>> डास निर्मिती प्रतिबंधक उपाययोजनांची टाळाटाळ, डोंबिवलीतील अकरा विकासकांना घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या नोटिसा
अमुदान कंपनी स्फोटानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ, औदयोगिक सुरक्षा, कामगार विभाग, एमआयडीसीचे अधिकारी डोंबिवली एमआयडीसी भागात नियमित फिरतात. त्यांना आजदे, सागर्ली, एमआयडीसी भागातील बेकायदा इमारतींची बांधकामे दिसत नाहीत का, असे प्रश्न रहिवासी करत आहेत. या भागातील बहुतांशी बेकायदा बांधकामे राजकीय पाठबळ असलेल्या भूमाफियांची आहेत. अधिक माहितीसाठी एमआयडीसी अधिकाऱ्यांना संपर्क केला, त्यांनी संपर्काला प्रतिसाद दिला नाही. पालिका अधिकाऱ्याने ही जागा एमआयडीसी हद्दीत आहे त्यांनी कारवाई करावी असे सांगितले.