ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्ग क्रमांक पाचमुळे थेट ठाणे शहराशी जोडली जाणारी आणि कल्याण, डोंबिवली या शहरांना थेट नवी मुंबईशी जोडून शहरांतर्गत वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या कल्याण – तळोजा मेट्रो १२ मार्गिकेच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने ( एमएमआरडीए) बांधकामासाठी १ हजार ८७७.८८ कोटींची निविदा यासाठी जाहीर केली असून मेट्रो मार्गाच्या उभारणीत हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणेपल्याड रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला नवा पर्याय देणारे मेट्रो प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात सुरू असताना ठाणेपल्याडचा कल्याण आणि डोंबिवली शहरांना ठाणे, भिवंडी, नवी मुंबई आणि थेट मुंबईशी जोडणारा मेट्रो १२ हा प्रकल्प वेगाने मार्गी लागतो आहे. सुमारे ५ हजार ८६५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे गेल्या वर्षात सर्वेक्षण पूर्ण झाले होते. नुकतीच एमएमआरडीएने या मेट्रोच्या स्थापत्य बांधकामासाठी निविदा जाहीर केली आहे. एकूण १ हजार ८७७.८८ कोटींची ही निविदा असून यात १७ स्थानके, मेट्रो ५ आणि मेट्रो कारशेडला जोडणाऱ्या मार्गिकेचे बांधकाम केले जाणार आहे. मेट्रो १२ च्या उभारणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आग्रही आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यास अवघ्या काही दिवसात मेट्रोच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. मेट्रो मार्गाच्या उभारणीतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असून हा वेगाने मार्गी लागल्यानंतर मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

हेही वाचा… लाभांश नाही तर, जमीन तरी द्या! थकित कर्जवसुलीसाठी ‘एमआयडीसी’च्या हालचाली, ‘समृद्धी’लगत जागेची मागणी

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईशी जोडली जाणार

मेट्रो क्रमांक चार वडाळा ते ठाणे शहरांना जोडली जाते आहे. तर ठाण्यापासून मेट्रो क्रमांक पाच सुरू होणार असून ती भिवंडी मार्गे कल्याण पर्यंत येणार आहे. कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थानकापर्यंत ही मेट्रो मार्ग क्रमांक पाच असून पुढे मेट्रो १२ ही याच ठिकाणाहून सुरू होणार आहे. ती थेट तळोजा पर्यंत जाणार आहे . पुढे नुकतीच सुरू झालेली नवी मुंबई मेट्रो बेलापूर ते पेणधर मार्गाला जोडली जाईल. त्यामुळे मेट्रो क्रमांक १२ मुळे कल्याण आणि डोंबिवली शहर मुंबई, ठाणे, नवी मुंबईशी जोडले जाईल.

हेही वाचा… डोंबिवली : कॉम्रेड विजयानंद हडकर यांचे निधन

मेट्रो १२ मधील स्थानके

मेट्रो मार्ग क्रमांक १२ एकूण २०.७५ किलोमीटरचा उन्नत मार्गावरून धावेल. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती, गणेश नगर, पिसवली गाव, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनार पाडा, मानपाडा, हेदूटने, कोळेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकळण, तुर्भे, पिसार्वे आणि तळोजा अशी १७ स्थानके या मार्गावर आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction of kalyan taloja metro 12 will begin soon tender release from mmrda asj