ठाणेकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत या उद्देशातून शहराच्या विविध भागात महापालिकेसह इतर प्राधिकरणांमार्फत सुरु असलेल्या कामांमुळे वाहतूक कोंडी होऊ लागली असतानाच, या कोंडीत आता शहरात माघी गणेशोत्सवासाठी रस्ते अडवून उभारण्यात येत असलेल्या मंडपांमुळे भर पडू लागल्याचे चित्र आहे.
हेही वाचा- ठाणे : करोना ओसरल्यानंतरही नोंदणीपद्धतीने विवाहाला पसंती
ठाणे महापालिका मुख्यालयाजवळच अंतर्गत रस्ता अडवून भला मोठा मंडप उभारणीचे काम सुरु असून या मार्गावरून पुढे गेल्यानंतर काही अंतरावर आणखी एक मंडप उभारणीचे काम सुरु आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संबंधित मंडळांकडून या मंडपांची उभारणी करण्यात येत असून त्याकडे महापालिका आणि पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याची घोषणा केल्यानंतर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. त्यात शहर सौंदर्यीकरणांतर्गत मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांलगतच्या भिंती तसेच उड्डाण पुलांवर विविध संकल्पनेच्या माध्यमातून रंगरंगोटीची कामे करण्यात येत आहेत. याशिवाय, ठाणेकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी विविध रस्ते नुतनीकरणाची कामे सुरु आहेत. या कामांमुळे शहरात कोंडीची समस्या निर्माण होत असतानाच, आता माघी गणेशोत्सवासाठी रस्ते अडवून मंडप उभारणीची कामे अनेक ठिकाणी सुरु असल्याचे चित्र दिसून येते. ठाणे शहरात गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवासाठी रस्ते अडविण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरु झाली असून या मंडपांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने सण आणि उत्सवासाठी रस्त्यावर मंडप उभारणीकरिता नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार रस्त्याच्या एक चर्तुथांश भागात मंडप उभारणीची परवानगी दिली जाते. असे असतानाही उत्सव मंडळांकडून नियमावलीची पायमल्ली होताना दिसून येत असून त्याकडे पालिका प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
हेही वाचा- योग्य-अयोग्यतेचा विवेक देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा; डॉ. अनिल काकोडकर
ठाणे शहरात यापुर्वी गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव वर्षातून एकदाच साजरा होत होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून हे दोन्ही उत्सव वर्षातून दोनदा साजरे करण्याची परंपरा सुरु झाली आहे. अशाचप्रकारे भाजपच्या एका नेत्याच्या माध्यमातून ठाणे महापालिका मुख्यालजवळील कचराळी तलाव परिरातील एका रस्त्यावर माघी गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी करण्यात येत आहे. या उत्सवासाठी रस्त्यावर भला मोठा मंडप उभारण्यात आला असून येथून केवळ एकच वाहन जाऊ शकेल, इतकी जागा सोडण्यात आलेली आहे. या मार्गावरून पुढे गेल्यानंतर काही अंतरावर आणखी एक मंडप उभारणीचे काम सुरु आहे. हे मंडळही राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संबंधित असल्याचे समजते. याठिकाणी रस्त्यावर बांबूचा सांगाडा उभारण्यात आलेला आहे. दरम्यान, दोन्ही मंडप उभारण्यात आलेल्या परिसरात शाळा असून त्याच्या बसगाड्या याच मार्गे वाहतूक करतात. या मंडपांच्या अडथळा निर्माण होऊन याठिकाणी कोंडी होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या संदर्भात ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदापुरे यांच्याशी संपर्क साधला. परंतु त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.