लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : महापालिका शाळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयापाठोपाठ आता शहरातील उद्यानात वाचनालय सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार नौपाड्यातील लोकमान्य टिळक उद्यान, कळवा येथील नक्षत्रवन उद्यान,वर्तकनगर येथील कम्युनिटी पार्क उद्यान येथे प्रायोगिक तत्त्वावर निसर्ग वाचनालय सुरू करण्यात आले आहे. ‘चला वाचूया’ या अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाच्या निमित्ताने पालिकेने उद्याने वाचन स्नेही बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.

ठाणे महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे सध्या तीन उद्यानांमध्ये नागरिकांसाठी विनामूल्य पद्धतीने वाचनालय सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी कोणतेही पुस्तक वाचकांना उद्यानात बसून वाचता येईल. ही पुस्तके उद्यानाबाहेर नेता येणार नाहीत. उद्यानाबाहेर जाताना पुस्तक पुन्हा कपाटात ठेवणे आवश्यक आहे. वाचनालयाची वेळ आणि उद्यानाची वेळ सारखीच राहील. या वाचनालयांसाठी सुमारे ८०० पुस्तके जमा झाली आहेत. ती वेगवेगळ्या सामाजिक संस्था, नागरिक, वाचनालये यांनी दिली आहेत. तीन उद्यानातील निसर्ग वाचनालयांना मिळणाऱ्या प्रतिसादातून पुढील वाचनालये सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

आणखी वाचा-केडीएमटीमध्ये सेवानिवृत्तांची थेट मुलाखतीची भरती प्रक्रिया तडकाफडकी रद्द

या वाचनालयात, सध्या उद्यान विषयक, झाडे आणि प्राणी यांचे महत्त्व सांगणारी पुस्तके, विविध कादंबऱ्या, प्रवास वर्णने, कविता संग्रह, बालसाहित्य उपलब्ध आहे. उद्यानात येणाऱ्या नागरिकांना वाचनाची गोडी लागावी, तसेच, ज्यांना वाचनाची गोडी आहे, त्यांना वाचनानंद मिळावा आणि त्यातून वाचनसंस्कृती वाढीस लागावी, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. पुस्तकांचे वाचन मुख्य प्रवाहात असणे ही काळाची गरज आहे. वारंवार पुस्तके दिसत राहिली तर वाचनासाठी नागरिक उद़्युक्त होतील. घरात, कार्यालयात, प्रवासात पुस्तकांची सहज उपलब्धता असेल, पुस्तकांचा सहवास लाभेल अशी व्यवस्था केली तर त्यातून वाचनाची ओढ निर्माण होईल, अशी या उपक्रमामागील भूमिका आहे.

ठाणे महापालिकेच्या काही उद्यानात निसर्ग वाचनालयांची सुरूवात करण्यात आली आहे. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वर्गखोल्यांमधील खुली वाचनालये म्हणजेच ‘चला वाचूया’ या अभिनव संकल्पनेचे हे पुढचे पाऊल आहे. उद्याने वाचन स्नेही बनविण्याचा प्रयत्न आहे. ठाणेकरांसाठी ही सुखद संधी महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेने एक छोटे पाऊल उचलले आहे, आता नागरिकांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद द्यावा. -अभिजीत बांगर, आयुक्त, ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction of nature libraries in thane by thane municipal corporation mrj