डोंबिवली – येथील पूर्व रेल्वे स्थानक जवळील रेल्वेच्या जागेत रेल्वे प्रशासनाने वाहनतळ उभारणीचे काम सुरू केले आहे. या वाहनतळामुळे दुचाकीवरून डोंबिवली रेल्वे स्थानकापर्यंत येणाऱ्या नोकरदार वर्गाची सोय होणार आहे.
डोंबिवली पूर्व भागात प्रशस्त वाहनतळ नसल्यामुळे नोकरदार वर्गाला आपली वाहने डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील रस्त्याच्या दुतर्फा उभी करून कामाच्या ठिकाणी जावे लागते. डोंबिवली पूर्व भागात रामनगर हद्दीत प्रशस्त वाहनतळ नाही. रामनगर रेल्वे उद्वाहन जवळ, जिन्याखाली प्रशस्त जागा असल्याने रेल्वे प्रशासनाने या जागेचा वाहनतळासाठी उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे जिन्याखालील जागा समतल करून हे वाहनतळ उभारण्यात येत आहे. या वाहनतळाचा डोंबिवली पूर्व भागातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना लाभ होणार आहे. पूर्व भागात प्रशस्त वाहनतळ नसल्याने डोंबिवली शहराच्या विविध भागांतून डोंबिवली रेल्वे स्थानक भागात येणारे वाहन चालक राजाजी रस्ता, एस. के. पाटील शाळा, टंडन रस्ता, चिपळूणकर रस्ता, बालभवन रस्ता, शिवमंदिर रस्ता भागात वाहने उभी करून कामाच्या ठिकाणी निघून जातात. या वाहनांवर कोणाचे नियंत्रण नसल्याने ही वाहने चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नोकरदार वर्ग अस्वस्थ आहे.
आता रेल्वेने डोंबिवली पूर्व भागात रेल्वे स्थानकाजवळ वाहनतळ उभारणीचे काम सुरू केल्याने नोकरदारांनी समाधान व्यक्त केले आहे. डोंबिवली पूर्व भागात बाजीप्रभू चौकात पाटकर प्लाझामध्ये तळ आणि पहिल्या माळ्यावर पालिकेचे वाहनतळ आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून हे वाहनतळ पालिकेने सुरू करावे म्हणून वाहतूक विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रयत्नशील आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे हे वाहनतळ सुरू होण्यात अडथळे येत आहेत. आता पालिकेच्या मालमत्ता विभागाने पाटकर प्लाझामधील वाहनतळ सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. वाढत्या वाहनांचा विचार करता कल्याण डोंबिवली पालिकेने आणि नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी मागील २३ वर्षांत डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात पालिकेचे एकही वाहनतळ उभारण्यासाठी प्रयत्न केले नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.
डोंबिवली पश्चिमेत व्दारका हाॅटेलसमोर रेल्वेचे वाहनतळ आहे. विष्णुनगर मासळी बाजाराच्या ठिकाणी वाहनतळ, मासळी बाजाराची इमारत विकसित करण्याचे नियोजन पालिकेने यापूर्वी केले होते. परंतु, या इमारतीच्या उभारणीत रस असलेल्या राजकीय मंडळींनी ते प्रयत्न हाणून पाडले. पालिकेची डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत पाडून चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौक ते इंदिरा चौक अशी बहुद्देशीय इमारत उभारणी करण्याचे नियोजन अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी सहा वर्षांपूर्वी केले होते. हे नियोजनही पालिकेतील नगरसेवकांनी आपल्या स्वार्थासाठी हाणून पाडले. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या स्वार्थी हितसंबंधांमुळे डोंबिवली रेल्वे स्थानक भागात एकही वाहनतळ उभे राहू शकले नाही. आता वाढती प्रवासीसंख्या आणि रेल्वे स्थानक भागात वाहने उभी करण्यासाठी एकही वाहनतळ नसल्याने नोकरदार वर्गाची सर्वाधिक कोंडी होत आहे. पाटकर प्लाझामधील वाहनतळ सुरू झाले तर तेथे पाचशेहून अधिक दुचाकी वाहने उभी राहू शकतील, असे वाहतूक विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वेने डोंबिवली पूर्व भागात वाहनतळ सुरू करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.