लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवली पूर्व भागातील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय रस्त्यावरील घरडा सर्कल ते आर. आर. रुग्णालयापर्यंतचा ३०० मीटरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन बांधणीचे काम सुरू केले आहे. या तंत्रज्ञानातून बांधण्यात आलेला रस्ता कमी खर्चिक आणि काही तासात वाहतुकीसाठी खुला करता येतो. त्यामुळे या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन काँक्रीटीकरण करण्यात आले, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिली.
डोंबिवली एमआयडीसीत पेंढरकर महाविद्यालय रस्त्यावरील घरडा सर्कल ते आर. आर. रुग्णालय दरम्यान रस्ता खोदकाम न करता डांबरीकरण रस्त्यावर प्लास्टिक टाकून काँक्रीट टाकण्यात येत असल्याचा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला होता. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निकृष्ट पध्दतीने बांधण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केल्या होत्या.
शहरातील रस्त्याविषयी तक्रारी आल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांना गुरुवारी सकाळी डोंबिवली एमआयडीसीतील रस्ते बांधणीच्या ठिकाणी बोलविले. यावेळी अभियंत्यांनी सांगितले, घरडा सर्कल ते आर. आर. रुग्णालय हा टप्पा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. या रस्ते कामाच्या काँक्रीटकरण कामासाठी १३ कोटी ८० लाखाचा निधी मंजूर आहे. सर्वाधिक वर्दळीचा शहराच्या मुख्य प्रवेशव्दारावरील हा रस्ता आहे. या रस्त्याचे काम मजबूत व्हावे म्हणून ‘व्हाईट टाॅपिंग’ पध्दतीने घरडा सर्कल ते आर. आर. रुग्णालय रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जात आहे. या कामाच्या पध्दतीत अस्तित्वा मधील डांबरी रस्त्याचे खोदकाम न करता त्याच्या डांबरी पृष्ठभागावर प्लास्टिक टाकून ‘अल्ट्रा थीन व्हाईट टाॅपिंगचा’ काँक्रीट गिलावा टाकण्यात येतो. या पध्दतीत रस्ते खोदाकामासाठी होणारा विलंब, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हे प्रकार टाळले जातात. गिलावा टाकल्यानंतर दोन ते तीन तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला होतो.
हेही वाचा… डोंबिवली एमआयडीसीत काँक्रीटच्या नव्या रस्त्यावर खोदकाम, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
नेहमीच्या ‘पेव्हमेंट क्वालिटी’ काँक्रीट पध्दतीपेक्षा सुमारे ४० टक्के रस्ते बांधणी खर्चात बचत होते. हा रस्ता मजबूत होत असल्याने त्याच्यावर पुढील दोन ते तीन वर्ष खड्डे पडत नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंत्री चव्हाण यांना दिली. अशा रस्ते कामामुळे रस्त्याच्या एका बाजुला सेवा वाहिन्यांसाठी स्वतंत्र भुयारी गटार केले जाते. सेवा वाहिन्या टाकताना, स्थलांतरित करताना प्रत्येकवेळी रस्ता खोदण्याची गरज पडत नाही. राज्याच्या अनेक शहरांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने अशाच पध्दतीने रस्ते काम हाती घेतली आहेत, असे अधिकारी म्हणाला. डोंबिवलीत प्रथमच अशा प्रकारचा अत्याधुनिक तंत्रज्ञानातील रस्ता तयार केला जात आहे, असे अधिकारी म्हणाला.