ठाणे : लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असणाऱ्या मध्य रेल्वेत प्रवास करताना रखडलेले वेळापत्रक, पुलांवरील गर्दी, फलाटांवरील तुटलेल्या फरशा, दुरवस्थेतील छते अशा विविध समस्यांना प्रवाशी सामोरे जात असतात. त्यावर उपाय म्हणुन मध्य रेल्वे प्रशासन वेळोवेळी दुरूस्तीचे कामे हाती घेत असल्याचे दिसून येते. याच अंतर्गत काही दिवसांपुर्वी ठाणे रेल्वे स्थानकात प्रशासनाच्यावतीने छताच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. याकरिता ठाणे स्थानकातील फलाटावरील पत्रे काढण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांना उन्हाचा झळा सहन कराव्या लागत होत्या. मात्र, रेल्वे प्रशासनाच्यावतीने आता फलाटांवरील एका बाजुचे छत दुरूस्त केले असून इतर ठिकाणच्या छत उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच प्रवाशांची उन्हाच्या झळांपासून घेतले आहे.
ठाणे शहर तसेच त्यापल्याडच्या शहरांमधून मुंबईत कामानिमित्ताने अनेक प्रवासी प्रवास करतात. तसेच ठाणे रेल्वे स्थानकातून नवी मुंबईच्या दिशेने अनेकजण जात असतात. त्यामुळे दररोज ठाणे स्थानकातून लाखो प्रवासी प्रवास करतात. तसेच ठाणे शहरातील वागळे इस्टेट, घोडबंदर भागात मोठ्याप्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि लघु उद्योग आहेत. तसेच विविध खासगी कार्यालये देखील आहेत. त्यामुळे विविध शहरातून दररोज रेल्वे मार्गे नोकरदार ठाणे शहरात येत असतात. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहा वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. फलाट क्रमांक पाचवरुन मुंबईहून कसारा, कर्जत, कल्याणच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जलद उपनगरीय रेल्वेगाड्या थांबतात. तर फलाट क्रमांक सहावरुन मुंबईच्या दिशेने जलद उपनगरीय रेल्वेगाड्या धावतात. याच फलाटांवरुन लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचीही वाहतुक होते. त्यामुळे स्थानकातील इतर फलाटांच्या तुलनेत या फलाटावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते.
फलाटाच्या रुंदीकरणानंतर काही महिने बांबूचे छत
या फलाटावर होणारी गर्दी लक्षात घेत काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक पाचचे रुंदीकरणाचे काम पुर्ण केले होते. फलाटाची रुंदी वाढल्याने यावरील छताचा भाग अपूरा पडत होता. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात बांबूच्या साहाय्याने ताडपत्रीचे छताची उभारणी केली होती. मात्र सध्या या फलाटावर नव्याने छत उभारणीचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. त्यामध्ये फलाट पाचच्या बाजुचे छत पुर्णपणे दुरूस्त करण्यात आले आहे. तसेच आता फलाट सहावरील देखील छत उभारणीचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काहीच दिवसात प्रवाशांची उन्हाच्या झळापासून सुटका होणार असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे रेल्वे स्थानकात फलाटावरील छतांचे काम सुरू आहे. उर्वरित काम लवकरच पुर्ण करण्यात येईल. – पी.डी.पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे