डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील दिवा बाजूकडील विस्तारित फलाटाच्या भागात छत उभारणीचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. मागील दोन वर्षापासून या विस्तारित फलाटाच्या भागात छत नसल्याने प्रवाशांचे उन, पावसाच्या दिवसात हाल होत होते. या छताचे काम पूर्ण झाल्यावर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर १५ डब्याची लोकल उभी राहण्यासाठी तीन वर्षापूर्वी फलाटाचे दिवा बाजूकडे विस्तारिकरण करण्यात आले. या विस्तारित फलाटावर १५ डब्याच्या, १२ डब्याच्या लोकल उभ्या राहू लागल्या. लोकलचे तीन डबे छत नसलेल्या भागात फलाटावर येत होते. विस्तारित फलाटाच्या भागात छत नसल्याने प्रवाशांना उन, पावसात उभे राहून लोकल पकडावी लागत होती.

हेही वाचा >>>नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हान; जप्त मतदान यंत्र पुन्हा निवडणूक आयोगाकडे

सकाळी गर्दीच्या वेळेत पाऊस असेल तर छत नसलेल्या भागातून लोकलमध्ये चढताना प्रवाशांचे हाल होत होते. जवळ छत्री असुनही चिंब भिजण्याची वेळ प्रवाशांवर येत होती. प्रवाशांना १५ डब्याच्या लोकलची सुविधा दिली. फलाटाचे विस्तारिकरण केले. पण फलाटावर छत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. याविषयी उपनगरी रेल्वे महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी वेळोवेळी रेल्वे अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील छताचा विषय उपस्थित करून फलाटावर छत बसविण्याची आग्रही मागणी लावून धरली होती. अनेक प्रवाशांनी व्यक्तिश रेल्वे अधिकाऱ्यांकडे या विषयी तक्रारी केल्या होत्या.

छत नसलेल्या भागात महिलांचा डबा, मालवाहू डबा येत होता. त्यामुळे महिला प्रवाशांची सर्वाधिक कुचंबणा होत होती. मालवाहू डब्यातून सामान उतरविल्यानंतर पाऊस असेल तर व्यापाऱ्यांचे हाल होत होते. उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांना छत असलेल्या भागात उभे राहून लोकल दूरवर दिसली की मग छत नसलेल्या भागात येऊन लोकल पकडावी लागत होती. अशीच परिस्थिती पावसाळ्यात होती. या लपंडावामुळे प्रवासी त्रस्त होते. प्रवासी, रेल्वे प्रवासी संघटनेच्या वाढत्या रेट्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाने डोंंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत उभारणीच्या कामाचा निर्णय घेतला. या कामाला आता सुरूवात केली आहे.

हेही वाचा >>>कल्याण पूर्वेत भाजपविरोधात मित्रपक्ष आक्रमक

हे काम सहा महिन्यापूर्वीच मंजूर झाले होते. परंतु, पावसाळ्यात हे काम करताना जोखीम होती. त्यामुळे पाऊस कमी झाल्याने छत उभारणीचे काम सुरू केले आहे. फलाट क्रमांक पाचवरील गर्दी आणि फलाटाचा अरूंद भागाचा विचार करून शक्यतो रात्रीच्या वेळेत छत उभारणीचे काम पूर्ण केले जाणार आहे, असे एका रेल्वे अभियंत्याने सांगितले.