कल्याण: मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेससाठी स्वतंत्र यार्ड (थांबा) उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. सहा नवीन फलाट, पत्रीपूलाजवळ एक उड्डाण पूल, मालवाहू सामानासाठी स्वतंत्र इमारत, जुने कल्याण रेल्वे स्थानक ते नवीन यार्ड दरम्यान तीन पादचारी पुलांची उभारणी अशी रचना या नवीन बांधकामात आहे. ८१२ कोटी खर्चाचा हा प्रकल्प आहे, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण रेल्वे स्थानकातून दररोज बाराशेहून अधिक उपनगरी लोकल, सातशेहून अधिक मेल, एक्सप्रेस, मालवाहू गाड्या धावतात. शंभर वर्षापू्र्वी उभारणी झालेले कल्याण रेल्वे स्थानक वाढत्या मेल, लोकलच्या धाव संख्येमुळे, वाढत्या गर्दीमुळे अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कल्याण रेल्वे स्थानकाच्या विस्तारिकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. रेल्वेची कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुमारे दोनशेहून अधिक एकर जमीन आहे. या जमिनीच्या काही भागावर एक्सप्रेस विस्तारीकरणाचे यार्ड बांधले जात आहे. या यार्डमुळे बाहेरगावहून येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या जुन्या कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच, सहा किंवा सातवर न येता त्या नवीन स्वतंत्र यार्डात जातील. मेल, एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात उभी असेल तर अनेक वेळा लोकलना स्थानकाच्या बाहेर थांबा मिळत होता. नवीन यार्डमुळे तो थांबा रद्द होणार आहे. लोकलची धावसंख्या वाढेल, अशी माहितीही अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा… मनोज जरांगे पाटील कल्याण दौऱ्यावर, २० नोव्हेंबरला जाहीर सभा

६२० मीटर लांबीचे सहा नवीन फलाट रेल्वे स्थानकात बांधण्यात येणार आहेत. प्रवासी नवीन यार्डातील फलाटावर उतरल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतंत्र पादचारी पूल, त्यांचे सामान वाहून नेण्यासाठी व्यवस्था, मालगाडीतील सामान उतरण्यासाठी आणि तो वाहनातून वाहून नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था स्थानकात असणार आहे. एक्सप्रेस, मालगाड्यांसाठी नवीन यार्डात स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. डबे तपासणीसाठी तपासणी यंत्रणा येथे असणार आहे. नवीन यार्डाच्या नियोजनामुळे रेल्वेकडून पत्रीपूल येथे एक उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. नवीन यार्डात उतलेल्या प्रवाशांना जुन्या कल्याण रेल्वे स्थानकात येण्यासाठी नवीन यार्डातील सहा फलाटांवर तीन पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. नवीन यार्डात तिकीटघर, वाणीज्य इमारत, मोटारमन, लोकोपायलट प्रतीक्षालय, प्रवासी प्रतीक्षालय, उपहारगृह अशी व्यवस्था असणार आहे.

नवीन रेल्वे यार्डाच्या उभारणीसाठी जमिनीचे सपाटीकरण, पायाभरणी, जुन्या इमारती तोडणे, जुन्या रेल्वे मार्गिका काढणे अशी कामे रेल्वेने हाती घेतली आहेत. येत्या दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे,असेही त्यांनी सांगितले. या नियोजनामुळे कल्याण रेल्वे स्थानकातील गर्दीचे विभाजन होणार आहे. त्यामुळे दोन्ही रेल्वे स्थानकातील प्रवासी गर्दीचा भार कमी होणार आहे. नव्या यार्डामुळे प्रवाशांना कल्याण पूर्वेतील रिक्षा, इतर खासगी वाहन करून इच्छित स्थळी जाणे शक्य होणार आहे. आतापर्यंत प्रवाशांना कल्याण पश्चिमेत येऊन मग रिक्षा, खासगी वाहनाने इच्छित स्थळी जावे लागत होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction of separate yard stand for long distance mail express has started at kalyan railway station of central railway dvr
Show comments