लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील पंडित दिनदयाळ रस्त्यावरील आनंदनगर उद्यानाच्या समोरील बाजूला एका अरुंद गल्लीत इतर इमारतींना बाधा पोहचले अशा पध्दतीने बांधकामधारकांनी सात माळ्याच्या बेकायदा इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. या इमारतीवर पालिकेची कारवाई होऊ नये म्हणून बांधकाम सुरू असताना इमारतीला सफेद रंग लावून इमारत अधिकृत असल्याचा देखावा बांधकामधारकांकडून उभा करण्यात आला आहे.
आनंदनगर उद्याना समोरील डोंबिवली नागरी सहकारी बँकेजवळील बाजुच्या गल्लीत इतर इमारतींच्या संरक्षित भिंतीना खेटून सामासिक अंतर न सोडता भूमाफियांनी ही बेकायदा इमारत चार ते पाच महिन्यात पूर्ण केली आहे. या बेकायदा इमारतीचा झाकोळ आल्याने आजुबाजुच्या इमारतींमधील घरात दिवसा अंधार पसरत आहे. बांधकामांच्या ठिकाणी भूमाफियांची दहशत असल्याने आजुबाजुचे रहिवासी या बेकायदा बांधकामा विषयी कल्याण डोंबिवली पालिकेत तक्रार करण्यास घाबरत आहेत.
आणखी वाचा-डोंबिवलीत रिक्षा चोरणारा सराईत चोर अंबरनाथ मधून अटक
या बेकायदा इमारतीला चोरुन पाणी पुरवठा होणार असल्याने परिसरातील इमारतींना कमी दाबाने पाणी होण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली. या इमारतींचे मल, सांडपाणी नेण्यासाठी इतर इमारतींच्या जागेचा वापर केला जाण्याची शक्यता रहिवाशांनी वर्तवली. ह प्रभाग पालिका साहाय्यक आयुक्तांच्या नजरेत येणार नाही अशा पध्दतीने या बेकायदा इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या इमारतीला घाईने वीज पुरवठा करुन या इमारतीमध्ये रहिवास सुरू करण्याच्या हालचाली भूमाफियांनी सुरू केल्या आहेत.
ह प्रभागात शासन सेवेतील साहाय्यक आयुक्त स्नेहा कर्पे हजर झाल्यापासून डोंबिवली पश्चिमेतील भूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. ह प्रभाग हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहता कामा नये, अशा सूचना कर्मचाऱ्यांना केल्या आहेत. यापूर्वीच्या प्रभागातील जुन्या बेकायदा इमारतींचा पाहणी दौरा साहाय्यक आयुक्त कर्पे यांनी सुरू केला आहे. कारवाईच्या भीतीने भूमाफियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ग प्रभागात असताना कर्पे यांनी बेकायदा बांधकामांवर कोणताही दबाव न जुमानता आक्रमक कारवाई केली होती.
आणखी वाचा-ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सरकता जिना प्रवाशांसाठी खुला
त्यामुळे आनंदनगर उद्यानासमोर बेकायदा इमारत उभी करणारे भूमाफिया अस्वस्थ आहेत. या इमारतींवर कारवाई होऊ नये यासाठी या चालू बांधकाम असलेल्या इमारतीमध्ये रहिवाशांचा निवास सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे परिसरातील रहिवाशांकडून समजते.
आनंदनगर मधील या इमारतीला पालिकेची परवानगी आहे का, अशी विचारणा नगररचना विभागातील एका अधिकाऱ्याला केली. त्यांनी आनंदनगर भागात डोंबिवली नागरी बँकेच्या गल्लीत एकाही नवीन बांधकामाला परवानगी दिली नाही, असे सांगितले. गेल्या आठ महिन्याच्या काळात ह प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी २६ भूमाफियांवरुन एमआरटीपीचे गुन्हे दाखल केले आहेत.