कल्याण – मुंबई महानगर क्षेत्रातील ठाण्यापुढील कल्याण परिसर हा महत्वाचा भाग आहे. या भागात नवीन उड्डाण पूल, रस्ते बांधले जात आहेत. झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी शिळफाटा ते कोन डबर डेकर रस्त्याची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथील एमसीएचआयच्या मालमत्ता प्रदर्शन कार्यक्रमात दिली.
कल्याण मधील फडके मैदानात एमसीएचआयतर्फे मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. १५० विकासकांच्या गृहप्रकल्पांची मांडणी येथे करण्यात आली आहे. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी भेट दिली.निती आयोगाचे पथक मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांच्या समोरील सादरीकरणानंतर या पथकाने मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील ठाण्यापुढील कल्याण परिसर हा राज्यातील इतर भागापेक्षा विकासाचा महत्वाचा केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या भागात अधिकाधिक नागरी सुविधा देण्यावर शासनाचा भर आहे. अनेक रस्ते, उड्डाण पूल या भागात उभारले जात आहेत. या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी शिळफाटा ते कोन डबल डेकर रस्त्याची उभारणी केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>मुंबईतील माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
आपले हक्काचे, मनासारखे घर असावे म्हणून प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. प्रत्येक नागरिकाला त्याच्या कुवतीप्रमाणे घर घेता यावे. विकासकांनी अशा घरांची उभारणी करावी म्हणून शासनाने वेळोवेळी विकासकांना त्यांच्या मागणीप्रमाणे सविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे विकासकांनी सामान्यांना रास्त दरात घर मिळेल यादृष्टीने प्रयत्न करावेत. करोना काळात विकासकांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन शासनाने त्यांना अनेक सवलती दिल्या. त्याची जाणीव ठेऊन विकासकांनी सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>महाराष्ट्र हे गुंडाराष्ट्र झालंय – जितेंद्र आव्हाड
देशाच्या पाच ट्रिलियन डाॅलर बरोबर महाराष्ट्र एक ट्रिलियन डालरचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करतोय. यासाठी सर्व उद्योग, व्यवसायातील मंडळींचा सहभाग महत्वाचा आहे. पंतप्रधान किसान योजनेतून घरे विकसित केली जात आहेत. समूह विकास योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. ठाण्यात ही योजना सुरू झाली. आता कल्याण शहराने यासाठी पुढाकार घ्यावा. विकासकांनी एकेक समूह विकास प्रकल्प विकसित करण्यासाठी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
नऊ मीटरच्या रस्त्यावर आठ मीटरच्या बांधकामाला परवानगी मिळावी अशी मागणी अध्यक्ष भरत छेड्डा यांनी केली. विकासकांची ही मागणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्य केली. ही मागणी मान्य करताना जुन्या इमारतींचा विकास करताना सामान्यांना रास्त दरात घरे मिळतील याचा विचार विकासकांनी करावा, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सुचविले.
‘दो दिवाने शहर मे, खा दाना धुंडते ह, आशियाना धुंडते है’ या जुन्या गाण्याची आठवण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरे, सामान्यांची परवड, विकास या विषयावर भाष्य केले.