लोकसत्ता प्रतिनिधी
उल्हासनगरः अनधिकृत बांधकामाची कीड लागलेल्या उल्हासनगर शहरात चक्क वालधुनी नदीकिनारीच अनधिकृत गाळे उभारल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. या १२ अनधिकृत गाळे उभारणाऱ्यांवर उल्हासनगर महापालिकेने गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी पालिकेच्या वतीने हे गाळे जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी महसूल अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त होता.
उल्हासनगर शहरात वेळोवेळी अनधिकृत बांधकामे डोके वर काढतात. या बांधकामांवर कारवाई केली जात असली तरी सातत्याने ही बांधकामे उभी राहत असल्याचे समोर आले आहे. मंगळवारीही अशाचप्रकारे पालिका प्रशासनाने कारवाई केली. उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या किनारी कॅम्प तीन भागात उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या परिसरात सहदेव कंपाऊंड जवळ नदीपात्रात बांधकाम केले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर पालिका प्रशासनाने या भागाचा दौरा करून बांधकामे निष्काशीत करण्याचे आदेश नोटीसीद्वारे दिले होते. ही जागा महसूल प्रशासनाची असल्यानी तहसिल कार्यालयालाही ही जागा ताब्यात घेऊन जागेची मालकी कळावी यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या ठिकाणी उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग तीनच्या सहायक आयुक्तांनी दिलेल्या तक्रारींवर दोघांवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमांअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आणखी वाचा- पालिका अभियंते, ठेकेदार गायब, डोंबिवली-कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांकडून खड्डे भरणीची कामे
भूमाफियांनी या ठिकाणी सुमारे १३ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम उभे केले होते. उल्हासनगर महापालिकेने मंगळवारी येथे उभारण्यात आलेले १२ गाळे जमिनदोस्त केले. उल्हासनगर महापालिकेच्या ५० कर्मचाऱ्यांसह दोन जेसीबी यंत्रे, चारही प्रभागाचे अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती उल्हासनगर महापालिकेचे अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागाचे गणेश शिंपी यांनी दिली आहे. यावेळी महसूल अधिकारीही उपस्थित होते. याप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शिंपी यांनी सांगितले आहे.