डोंबिवलीत महाराष्ट्रनगर मधील बनावट मोजणी; नकाशाच्या आधारावर बांधलेल्या इमारतीची परवानगी रद्द

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण- डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील महाराष्ट्रनगर मधील खासगी आणि गुरचरण जमिनीवर बांधण्यात आलेल्या एका ११ माळ्याच्या बेकायदा इमारतीची बांधकाम परवानगी कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाच्या साहाय्यक संचालक नगररचनाकार दीक्षा सावंत यांनी आयुक्तांच्या आदेशावरुन रद्द केली आहे.

तलाठी साझा गावदेवी येथील महाराष्ट्र नगर मधील सर्व्हे क्रमांक १५८ (जुना) ७७ (नवीन) हिस्सा क्र. ४, ५ या खासगी आणि काही भाग गुरचरण असलेल्या आणि गाव हद्दीवर असलेल्या जागेत या इमारतीची बांधकाम धारकांनी बेकायदा उभारणी केली आहे. या भूक्षेत्रावर इमारत उभारणीसाठी रमेश कचरू म्हात्रे, विकासक विनोद बिल्डर्सचे विनोद किसन म्हात्रे आणि वास्तुविशारद धीरज पाटील यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागात जुलै २०२१ मध्ये इमारत बांधकाम आराखडा मंजुरीसाठी प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव सादर करताना विनोद बिल्डर्सने उपअधीक्षक, भूमी अभीलेख विभागाचा बनावट मोजणी नकाशा नगररचना विभागात सादर केला होता. सुरुवातीला बनावट मोजणी नकाशाचा विषय निदर्शनास न आल्याने नगररचना विभागाने विनोद बिल्डर्सला बांधकामाची परवानगी दिली. या परवानगीच्या आधारे बांधकाम धारकाने सहा माळ्याची इमारत वर्षभरात बांधली.

पालिकेचे आपल्या बांधकामाकडे लक्ष नाही हे लक्षात आल्यावर विकासकाने वाढीव पाच बेकायदा माळे या इमारतीवर बांधले. या प्रकरणी पालिकेत तक्रार होताच नगररचना विभागाने या प्रकरणाची चौकशी केली.

त्यावेळी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत विकासकाने बेकायदा मजले बांधले असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या इमारत बांधकामाची सर्व कागदपत्र नव्याने तपासण्यात आली. त्यावेळी विनोद बिल्डर्सने भूमी अभीलेख विभागाचा बनावट मोजणी नकाशा इमारत प्रस्ताव मंजुरीसाठी जोडला होता असे निदर्शनास आले. या इमारतीचा काही भाग हा गुरचरण जमिनीत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. पालिकेने भूमी अभीलेख विभागाकडे विनोद बिल्डर्सने दाखल केलेल्या नकाशाची पडताळणी केली. त्यावेळी अशाप्रकारचा मोजणी नकाशा भूमी अभीलेख विभागाने दिला नसल्याचे अभीलेख विभागाने पालिकेच्या नगररचना विभागाला कळविले.

नगररचना विभागाने विनोद बिल्डर्सला मोजणी नकाशाची प्रत बनावट असल्याचे कळविले. त्यावर विकासकाने पालिकेला खुलासा दिला. तो असमाधानकारक असल्याने नगररचना विभागाच्या साहाय्यक संचालक दीक्षा सावंत यांनी फेटाळून लावला.

पालिकेची फसवणूक, दिशाभूल करुन महाराष्ट्रनगर मध्ये विनोद बिल्डर्सने बेकायदा इमारत उभारली असल्याची बाब आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निदर्सनास आणण्यात आली. आयुक्तांनी बेकायदा बांधकामांची अजिबात पाठराखण करु नका असे सांगत या इमारतीची बांधकाम परवानगी तात्काळ रद्द करण्याचे आदेश नगररचना विभागाला दिले. त्याप्रमाणे साहाय्यक संचालक नगररचना सावंत यांनी महाराष्ट्रनगर मधील गुरचरण जमिनीवरील इमारतीची बांधकाम परवानगी एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीच्या आधारे रद्द केली.

या कारवाईची प्रत अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप यांना कारवाई करण्यासाठी देण्यात आली आहे. या बेकायदा इमारतीत सुमारे २० हून अधिक कुटुंब राहतात.

या इमारती मधील रहिवाशांनी मात्र या इमारतीचा सुधारित बांधकाम आराखडा मंजूर झाला आहे. आता कोणतीही अडचण येथे नाही असे सांगितले. नगररचना विभागातील अधिकाऱ्याने असा कोणताही सुधारित आराखडा मंजूर झालेला नाही. गुरचरण जमिनीचा काही भाग या इमारतीने बाधित होत आहे, असे सांगितले.

या इमारतीमधील रहिवाशांची विकासकाने फसवणूक केल्याने आ. गणपत गायकवाड यांनी या इमारतीची सर्व कागदपत्र आयुक्तांकडून मागविली आहेत.

“ डोंबिवलीतील महाराष्ट्रनगरमधील विनोद बिल्डर्सच्या बांधकामाची परवानगी रद्द करण्यात आली आहे. या इमारतीचा कोणताही सुधारित बांधकाम आराखडा नगररचना विभागान मंजूर केलेला नाही. यापुढे मंजुरी मिळणारही नाही.”

ज्ञानेश्वर आडके-अभियंता (नगररचना विभाग)

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction permit for 11 storey building built on private land in maharashtra nagar cancelled zws