स्वप्ने मोठी पाहावीत. समाजाचे, देशाचे हित जपता येईल अशी स्वप्ने पाहून त्यांचा पाठपुरावा करणे हे तर असिधाराव्रत म्हणावे लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘न घेतले की हे व्रत आम्ही अंधतेने’ या काव्यातील पंक्तींप्रमाणे जगण्यासाठी एक विलक्षण जिद्द आणि तपश्चर्या करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांच्या सेवेपासून सामाजिक बांधिलकीचे एक स्वप्न पाहिले आणि ते उभे केले. रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून आज देशभर अद्भुत अशी रुग्णसेवा व सामाजिक काम सुरूआहे. असेच एक स्वप्न भारताचे दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनीही पाहिले- २०२० साली भारत महासत्ता करण्याचे.. या थोर व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुण्याच्या मुकुंदराव गोरे यांनी २००५ मध्ये ‘समर्थ भारत व्यासपीठ’ या संस्थेची पुण्यात स्थापना केली. सध्या ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी समर्थ भारत व्यासपीठाची ही चळवळ रुजू पाहात आहे. लोकांच्या थेट सहभागातून समाजाचा विकास करायचे काम ही संस्था करते.
ठाण्यात २००८ मध्ये या संस्थेने काम सुरू केले. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. दाऊद दळवी हे या संस्थेचे अध्यक्ष, तर उल्हास कार्ले, मंगेश वाळंज, पुरुषोत्तम आगवण, प्रशांत सावंत, मिलिंद पाटणकर, रघुनाथ कुलकर्णी, भटू सावंत आणि आरती नेमाणे हे बिनीचे शिलेदार. ठाणे शहराचा २०२० सालापर्यंत विकास कसा व्हावा याचा आराखडा ठाण्यातील तज्ज्ञ व जुन्याजाणत्या लोकांशी बोलून या मंडळींनी तयार केला. एवढय़ावरच ‘समर्थ भारत’चे हे शिलेदार थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणिवेतून एकापेक्षा एक असे उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे राबविण्यास सुरुवात केली. गणेशोत्सवाच्या काळात ठाणे शहरात जमा होणारे निर्माल्य गोळा करून त्यापासून खतनिर्मितीचा ‘श्रीगणेशा’ त्यांनी केला. सुरुवातीला या कामाला काही गणेश मंडळांनी विरोधही केला. परंतु निर्माल्यामधून तयार करण्यात आलेल्या खताच्या दोन किलोच्या पिशव्या जेव्हा संस्थेने गणेशोत्सव मंडळांना भेटीदाखल दिल्या तेव्हा त्यांना या कामाची महती पटून त्यांनीही साथ देण्यास सुरुवात केली. ठाण्यात गणेशोत्सवाच्या काळात किमान सव्वाशे टन निर्माल्य गोळा होत असे. पुढे मासुंदा व कोपिनेश्वर मंदिरातील निर्माल्य गोळा करून संस्थेने खतनिर्मितीचा पायलट प्रकल्प केला. त्यात यश मिळाल्यानंतर महापालिकेच्या मदतीने संपूर्ण ठाणे शहरातून निर्माल्य जमा करण्यात येऊ लागले. त्याचप्रमाणे ठाण्यातील १७ स्मशानभूमी, फुलबाजार, मंदिरे आणि सहकारी सोसायटय़ांमधूनही गार्डन वेस्ट जमा करून पालिकेने कोपरी येथे दिलेल्या पाच हजार चौरस फूट जागेत खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला. सुरुवातीला रोज सात टन निर्माल्य जमा होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात सध्या रोज चार टन निर्माल्यापासून खतनिर्मिती केली जाते. तसेच सोसायटय़ांमधून जमा करण्यात येणाऱ्या गार्डन वेस्टपासून पांढरा कोळसा (ब्रिकेट) तयार करून ते पालिकेच्या रुग्णालयामध्ये तसेच काही कंपन्यांना इंधन म्हणून दिले जाते. या साऱ्यातून काही पैसे संस्थेला मिळतात. त्यातून संस्थेचा खर्च चालतो. वेतन आणि इतर खर्च मिळून संस्थेला दरमहा साडेतीन लाख रुपये लागतात. ठाणे पालिकेने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आवश्यक असलेली जादा जागाही दिली. तसेच काही प्रमाणात आर्थिक पाठबळही दिले. पालिका आयुक्त संजय जयस्वाल व महापौर याकामी संस्थेच्या ठामपणे पाठीशी उभे राहिले. हे काम करत असताना निर्माल्य गोळा करण्यापासून ते खतनिर्मितीसाठी कामगार मिळविण्याचा प्रश्न आला. त्यासाठी भटू सावंत हे ठाण्यातील मातंग समाजाच्या सर्व वस्त्यांमध्ये फिरले. तेथील आर्थिक विषमतेचे चित्र पाहून या समाजातील मुलांच्या शिक्षणापासून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी संस्थेने महिला बचत गटांची स्थापना करण्यास सुरुवात केली. यातून आज साडेतीनशे महिला बचत गट उभे राहिले. तसेच ठाणे जिल्ह्य़ातील महिला बचत गटांना आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी त्यांनी एक हक्काचे व्यासपीठही उभारले. त्यातूनच गेली दोन-तीन वर्षे ठाण्यात तीन दिवसांचा ‘ती महोत्सव’ भरविण्यात येतो. या काळात महिला बचत गटांच्या वस्तूंची लाखांनी विक्रीही होते. मोठय़ा संख्येने ठाणेकर या उपक्रमाला भेट देताना दिसतात. रस्त्यावरील मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, पथनाटय़ प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकासापासून इंग्रजी संभाषणापर्यंत अनेक उपक्रम ‘समर्थ भारत व्यासपीठ’च्या माध्यमातून राबविण्यात येत असतात; परंतु केवळ काही उपक्रम करण्यापुरती ही संस्था मर्यादित नाही. त्यांचा उद्देश सामाजिक बांधिलकीची चळवळ समाजात तळागाळापर्यंत रुजावी व लोकांनी थेट यामध्ये सहभागी व्हावे हा आहे. ‘भारत २०२०’मध्ये महासत्ता बनण्याचे डॉ. कलाम यांचे स्वप्न लक्षात घेऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ाचा लोकसहभागातून विकास करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी ठाण्यामध्येच राहणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील ६० तज्ज्ञांच्या सहभागातून २०२० साली ठाणे कसे असावे याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. यामध्ये रस्ते, वाहतूक व्यवस्था, पाणी व्यवस्थेपासून पर्यावरणापर्यंत आणि सांस्कृतिक विकासापासून सामाजिक उपक्रमांपर्यंत अनेक गोष्टींची साकल्याने मांडणी करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना एका व्यासपीठावर आणण्याचे मोठे काम समर्थ भारत व्यासपीठने निर्धार परिषद भरवून केले. त्यातूनच ‘ठाणे जिल्हा सामाजिक समन्वय समिती’ची स्थापना करण्यात येऊन कार्यकर्ता प्रशिक्षण, संस्थांची धोरणे व अंमलबजावणी, निधी उपलब्धतेची साधने तसेच शासकीय मदत मिळविण्यापासून सामाजिक संस्थांना येणाऱ्या अडचणींचा साकल्याने विचार करून धोरणे तयार करण्याचे काम केले जाते. दरवर्षी मार्च महिन्यात तीन दिवसांच्या महिला बचत गटांसाठी ‘ती महोत्सव’ आयोजित केला जातो, तर जून महिन्यात ‘ग्रीन आयडिया’ महोत्सवाचे आयोजन करून पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना एका व्यासपीठावर आणून पर्यावरण जागृतीचे उपक्रम राबविले जातात, असे भटू सावंत यांनी सांगितले. रस्त्यावरील मुलांसाठी शाळेचा उपक्रमही लवकरच सुरू करण्यात येणार असून संस्थेच्या या वाटचालीत आरती परब, आरती नेमाणे, पल्लवी जाधव या तिशीतील महिलांचे मोठे योगदान असल्याचे भटू सावंत यांनी आवर्जून सांगितले. महापालिकेच्या शाळांच्याही सर्वेक्षणाचे काम संस्थेने पूर्ण केले आहे. पालिका शाळांमधील शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अन्य अतिरिक्त कामांमुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीविरोधातही संस्थेने आवाज उठविण्याचे काम केले आहे.
समर्थ भारत व्यासपीठ, ठाणे