कल्याण– दोन वर्षापूर्वी करोना विषाणूने आजारी कल्याण मधील एका रुग्णाला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचाराचा खर्च चार लाख ४७ हजार झाला होता. या रुग्णाचे पाच लाखाचे विमा कवच असुनही आरोग्य विमा कंपनीने रुग्णालय खर्चाची पूर्ण रक्कम देण्यास नकार दिला. रुग्णाने याप्रकरणी ठाणे जिल्हा ग्राहक मंचाकडे दाद मागितली होती. मंचाने दोन्ही बाजुचे म्हणणे एकून रुग्णाला रुग्णालय खर्चाची संपूर्ण रक्कम देण्याचे आदेश आरोग्य विमा कंपनीला दिले.
दोन वर्षापूर्वीच्या करोना महासाथीमध्ये कल्याण मधील बैलबाजारात राहणारे रहिवासी जयेश व्दारकादास राजा हे करोना विषाणूने आजारी पडले. त्यांना १ जुलै २०२० ते १२ जुलै २०२० कालावधीत कल्याण मधील रिध्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दाखल झाल्यानंतर राजा यांनी आपण करोनाने आजारी असल्याची माहिती आपले आरोग्य विमा कवच उतरविणाऱ्या कंपनी अधिकाऱ्यांना दिली. राजा यांनी पाच लाख २५ हजाराचा विमा उतरविला आहे. नव्याने करोना साथ उद्भवल्याने सर्व आरोग्य विमा कंपन्यांच्या यादीत या आजाराचा खर्च देण्याची तरतूद नव्हती. त्यामुळे आजारी रुग्णांना विमा कंपन्यांकडून ही रक्कम मिळविताना त्रास सहन करावा लागला.
हेही वाचा >>> ठाकुर्लीतील नागरिकांना फसविणारा जवाहिर राजस्थान मधून पाच वर्षांनी अटक
राजा यांच्या बारा दिवसाच्या उपचाराचा खर्च चार लाख ४७ हजार रुपये झाला होता. विमा कंपनीने एक लाख ३४ हजार रुपये रुग्णालयात भरणा केले होते. आपल्या विमा कवचाप्रमाणे विमा कंपनीने आपली पूर्ण रक्कम भरणा करावी, असा आग्रह राजा यांचा होता. कंपनी त्यास तयार नव्हती. अखेर राजा यांनी ठाणे जिल्हा ग्राहक मंचाकडे दाद मागितली. आपल्यावरील उपचार खर्चाचे तीन लाख १३ हजार रुपये विमा कंपनीने रुग्णालयात भरणा करावे, अशी मागणी केली.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये ‘द केरला स्टोरी’ पाहण्यासाठी तरुणी, महिलांची गर्दी
मंचाने विमा कंपनीला नोटीस पाठवून म्हणणे मांडण्याची संधी दिली. कंपनीने बचावाची भूमिका घेतली आणि एकूण खर्चाची रक्कम का देऊ शकत नाही. एक लाख ३४ हजार रुपये रक्कम रुग्णालयात का भरणा केली याची उत्तरे कंपनी मंचासमोर देऊ शकली नाही. मंचाचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी, सदस्या ॲड. पूनम महर्षी यांनी राजा यांना रुग्णालय खर्चातील तीन लाख १३ हजार रुपयांची रक्कम देण्याचे तसेच मानसिक त्रासापोटी २० हजार रुपये, दाव्यासाठी १० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश आरोग्य विमा कंपनीला दिले.