घरगुती मसाले, लोणच्यांना ग्राहकांची मागणी
वसई : पावसाळ्याआधी घरगुती पदार्थ, मसाले, वाळवण बनवण्यासाठी महिलांची लगबग वसई-विरारमध्ये सुरू आहे. महिलावर्ग यासाठी साहित्याची जमवाजमव करून विविध पदार्थ बनवण्यात मग्न आहेत. त्यातच महिला बचतगटही बाजारात मागणी असल्याने विविध पदार्थ बनवून त्याची विक्री करत आहे.
घरगुती मसाला तयार करण्यासाठी बाजारातून मिरच्या, दालचिनी, तमालपत्रे, धणे, लवंग, बडीशेप, काळीमिरी, दगडफूल, सुके खोबरे, हळकुंड आदी जिन्नसांची खरेदी केली जात आहे. या पदार्थापासून मसाला तयार करण्यासाठी वसई-विरारमधील गिरण्यांमध्ये चक्क रांगा लावल्या जात आहेत. वसईच्या पश्चिम पट्टय़ातील नायगाव, सोपारा, उमराळे, आगाशी, नंदाखाल, बोळींज, गिरीज, भुईगाव, होळी ते वसई पूर्वेकडील मालजीपाडा, कामण, गोखिवरे, भाताणे, खानिवडे, ससूनवघर, शिवणसई, वज्रेश्वरी आदी ग्रामीण भागात मसाला बनविण्यासाठी लगबग सुरू आहे.
आगरी, भंडारी, वाडवळ, कोळी यांसह विविध समाजातील महिला त्यांच्या आहारप्रकारानुसार मसाला तयार करत आहेत. वसई पट्टय़ातील अनेक भागात आजही मसाले दुकानातून खरेदी करण्यापेक्षा ते घरीच तयार केले जातात. शहरी भागात मात्र जागेचा अभाव असल्याने अनेक जण दुकानातूनच मसाले खरेदी करत असल्याचे चित्र आहे.
घरगुती मसाले, वाळवण, लोणचे घरीच तयार केले जात असल्याने त्याची चव आणि दर्जा उत्तम राहतो.
– शर्मिष्ठा राऊत, गृहिणी
घरगुती चव देणाऱ्या लघुउद्योजकांकडून, बचतगटांकडून कुरडया, पापड, चकल्या, शेवया आदी वस्तू विकत घेतल्या जात आहेत. त्यामुळे आर्थिक फायदा होत आहे.
– कोमल पाटील, बचत गटाच्या कार्यकर्त्यां
वाळवण बनवण्यावरही भर
कडाक्याच्या उन्हात आपल्या अंगणात साबुदाण्याच्या चिकवडय़ा, तांदळाच्या उकडून केलेल्या पांढऱ्याशुभ्र फेण्या, कोहळ्याचे सांडगे, दही मिरच्या, पापड, कुरडया तयार केल्या जात आहे. बाजारात या तयार वस्तू मिळत असल्या तरी घरी चांगल्या प्रतीचे आणि आपल्या आवडीनुसार पदार्थ बनवण्यावर महिलांचा जास्त कल असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मसाला आणि अन्य पदार्थ तयार केले जातात आणि त्यानंतर त्याचा आहारात वापर केला जातो. लोणचे तयार करण्यावरही महिलांचा भर आहे. त्यासाठी बाजारात कैऱ्या खरेदी केल्या जात आहे