ठाणे – पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सिडकोने गरिब आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी जाहिर केलेली २६ हजार घरांची ‘माझे पसंतीचे घर’ योजना वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त ठरत असताना, या प्रकरणी इरादापत्रात कमी आकारमान मिळल्यामुळे अस्वस्थ झालेल्या ग्राहकांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे धाव घेतली आहे. या घरांची किंमत तुलनेने जादा असल्यामुळे यापुर्वीच या योजनेविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. असे असताना घराचे आकारमानही लहान असल्यामुळे पंतप्रधानाच्या नावे असलेली ही योजना आमची फसवणूक करणारी आहे असे ग्राहकांचे म्हणणे आहे.
पालघर, वाशी, बामणडोंगरी, तळोजा, मानसरोवर, कळंबोली आणि पनवेल या सात उपनगरांमध्ये ही घरे उभारली जाणार आहेत. या योजनेच्या पहिल्याच जाहिरातीपासून ही पसंतीची योजना अनेकांसाठी नापसंतीची ठरू लागली. गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही परवडणारी घरे महागच ठरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच, या आकारमानही फसव्या असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत. सिडकोने जाहिर केल्याप्रमाणे अल्प उत्पन्न गटासाठी ३२२ चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या सदनिका देण्यात येणार होत्या. मात्र, सोडतीच्या निकालानंतर विजेत्यांना मिळालेल्या इरादापत्रात सदनिकेचे रेरा क्षेत्रफळ २९१.९१ चौरस फूट इतके असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुळ घोषणा केलेल्या क्षेत्रफळापेक्षा ३० चौरस फूट कमी असल्याच्या तक्रारी काही लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत. मध्यंतरी ऐरोलीचे माजी आमदार संजय नाईक यांनी या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र व्यवहार केला होता. ग्राहकांची ही खुद्द फसवणूक असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले होते. सिडकोने विक्रीस काढलेल्या २६ हजार घरांसाठी २१ हजार अर्जदारांनी अंतिम नोंदणी केली आहे. दरम्यान घराच्या आकारमानावरून नाराज असलेल्या काही ग्राहकांनी नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन यासंबंधीची तक्रार नोंदवली. नगरविकास मंत्री म्हणुन आपण या कामी लक्ष घालावे, अशी विनंती ही त्यांना करण्यात आली.
सिडकोचे म्हणणे काय?
किफायतशीर दर, गृहसंकुलांतील सोयी सुविधा व पारदर्शक गृहनिर्माण प्रक्रिया या निकषांवर नवी मुंबईमध्ये सिडकोच्या घरांना पहिली पसंती मिळत आहे. पारदर्शकता हा सिडकोच्या गृहनिर्माण योजनांचा गाभा असल्याने, जाहीर करण्यात आलेल्या घरांच्या किमती, क्षेत्रफळ, सोयी सुविधा इत्यादी बाबत कोणतीही विसंगती नसते. या योजनेतील घरांचे चटई क्षेत्रफळ हे ३२२ चौरस फूट (१ BHK), ३९८ चौरस फूट (१ BHK) व ५४० चौरस फूट (२ BHK) राहील व बेडरूम / हॉलचे क्षेत्रफळ किती असेल याबाबतही गृहनिर्माण योजनेत नमूद करण्यात आले होते. गृहनिर्माण योजनेत आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गट (LIG) या घटकातील १ बीएचके घरांचे क्षेत्रफळ हे ३२२ चौ. फू. असल्याचे नमूद करण्यात आले होते. सदर ३२२ चौ.फू क्षेत्रफळामध्ये त्या घरात असणाऱ्या दोन बंदिस्त बाल्कनीचे (Enclosed Balcony) क्षेत्रफळ समाविष्ट आहे.
प्रकल्पातील घरांची रेरामध्ये नोंदणी करताना रेरा चटई क्षेत्रफळात सदर दोन Enclosed Balcony च्या क्षेत्रफळाचा समावेश करण्यात येत नाही, असे सिडकोचे म्हणणे आहे. तसेच, प्रत्येक प्रकल्पात असणाऱ्या सोयीसुविधांबाबतही गृहनिर्माण योजनेत नमूद करण्यात आले होते. त्यामुळे या योजनेत अर्ज करताना घरांचा आकार / क्षेत्रफळ व प्रकल्पांतर्गत असणाऱ्या सोयीसुविधांबाबत सर्व अर्जदारांना कल्पना होती. बाजारभावाच्या किमती व सिडकोचे किंमत निश्चितीचे धोरण लक्षात घेऊन घरांच्या किमती ठरवण्यात आलेल्या आहेत. याशिवाय गुणवत्तापूर्ण बांधकाम, घराच्या किमतीमध्ये २ वर्षांचा देखभाल खर्च समाविष्ट, क्लिअर प्रॉपर्टी टायटल, मोफत पार्किंग, आरसीसी प्रीकास्ट/मायवान तंत्रज्ञानाचा वापर, लॉन, उद्यान इत्यादी सुविधांनी ही गृहसंकुले परिपूर्ण आहेत, असा सिडकोचा दावा आहे.