ठाणे : भिवंडी येथील राहनाळ भागात कंटेनरची धडक घराच्या भिंतीला बसल्याने भिंत अंगावर कोसळून एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे.
विकी महतो (२३) असे मृताचे नाव असून पंकज राय, दिपक राय, अमितकुमार राय आणि सोनुकुमार भंडारी अशी जखमींची नावे आहेत. राहनाळ येथील लक्ष्मी टिंबर परिसरातील एका खोलीमध्ये हे पाचही जण राहत होते. ही खोली रस्त्यालगत आहे. सोमवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास या भागात एक कंटेनर आला होता. हा कंटेनर चालक मागे घेत असताना खोलीच्या भिंतीला तो धडकला. त्यावेळी घरामध्ये झोपलेल्या विकी यांच्या अंगावर भिंत अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला. तर, इतर चारजण या घटनेत जखमी झाले. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे.