पालिकेच्याच तपासणीतील निष्कर्ष, वितरण व्यवस्थेतील ५ टक्के पाणी पिण्यास अयोग्य
एकीकडे अपुऱ्या पावसामुळे आधीच चाळीस ते पन्नास टक्के पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतानाच दुसरीकडे गेल्या दोन महिन्यांपासून ठाणे शहरातील वेगवेगळय़ा भागांतील घरांत साठवण्यात येणारे पाणी २१ टक्के दूषित असल्याचे आढळून आले आहे, तर दुसरीकडे ठाणे, मुंब्रा, कळवा या तिन्ही शहरांतील वितरण व्यवस्थेतून ५ टक्के दूषित पाण्याचा नागरिकांना पुरवठा होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पाणीटंचाईमुळे अस्वस्थ झालेल्या नागरिकांसमोर आजारांचाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, ठाणे शहरातील काजूवाडी तसेच मुंब्रा या दोन्ही भागांत दूषित पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही पाणी नमुने तपासणी अहवालातून समोर आले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांना महापालिकेकडून दररोज ४६० दशलक्ष पाणीपुरवठा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकानुसार वितरण व्यवस्थेतील पाण्याची गुणवत्ता ९५ टक्के, तर घरातील साठवणुकीच्या पाण्याची गुणवत्ता ८४ टक्के असणे गरजेचे आहे. या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येतात. याशिवाय पालिकेच्या आरोग्य विभागाकडूनही घरांतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येतात. या दोन्ही विभागांनी जानेवारी तसेच फेब्रुवारी महिन्यात पाठविलेल्या पाणी नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल नुकताच आला असून त्यानुसार वितरण व्यवस्थेतील ९५ टक्के पाणी पिण्यास योग्य, तर पाच टक्के पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे तपासणी अहवालातून समोर आले आहे. तसेच घरांमधील साठवणुकीतील ७९ टक्के पाणी पिण्यास योग्य, तर २१ टक्के पाणी पिण्यास अयोग्य असल्याची माहिती अहवालातून पुढे आली आहे. या वृत्तास महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दुजोरा दिला आहे. वितरण व्यवस्थेतील पाण्याचे सुमारे ८९५, तर घरातील साठवणुकीच्या पाण्याचे सुमारे ९९८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
काजूवाडी, मुंब्य्रात सर्वाधिक
ठाणे शहरातील काजूवाडी तसेच मुंब्रा या दोन्ही भागांत दूषित पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही या अहवालातून समोर आले आहे. आरोग्य विभागाने जानेवारी महिन्यात काजूवाडी भागातील घरांमधून साठवणुकीच्या पाण्याचे १०२ नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी ५८ नमुन्यांतील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात याच भागातून ८४ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यामध्ये २० नमुन्यांतील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले. या दोन्ही महिन्यांतील आकडेवारी पाहाता फेब्रुवारी महिन्यात दूषित पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. असे असले तरी या भागामध्ये दूषित पाण्यामुळे गेल्या दोन महिन्यांत सुमारे पाचशे ते सहाशे नागरिकांना उलटय़ा, जुलाब, मळमळणे, अतिसार अशा आजारांची लागण झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तसेच मुंब्रा भागातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मुंब्रा भागातून जानेवारी महिन्यात १३१ घरांतील साठवणूक केलेल्या पाण्याचे नमुने घेतले असून त्यामध्ये ८९ नमुन्यांतील पाणी पिण्यास योग्य, तर ४२ नमुन्यांतील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात मुंब्रा भागातून घेतलेल्या नमुन्यांपैकी १४ नमुन्यांतील पाणी पिण्यास योग्य, तर ११ नमुन्यांतील पाणी पिण्यास अयोग्य आढळून आले.