उल्हासनगरः कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कंत्राटदाराकडून सुरू असलेली बेपर्वाई आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातामुळे संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र त्यापूर्वीच स्थानिक लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि स्थानिकांच्या संयुक्त बैठकीत कंत्राटदाराकडून काम काढून दुसऱ्या कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेण्यात आला. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आंदोलकांना आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्याची माहिती आंदोलकांनी दिली.
हेही वाचा >>> वाहन विकण्याच्या बहाण्याने तोतया लष्करी जवानाकडून कल्याणमधील शिंप्याची फसवणूक
कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाचे म्हारळ ते पाचवामैल या भागात सुरू आहे. मात्र कंत्राटदाराकडून येथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था न उभारता रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक अपघात झाले. त्याचा स्थानिक नागरिकांना मोठा फटका बसतो आहे. येथे असलेल्या अनेक शाळा, महाविद्यालये आणि येथून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या वाहनांना रस्त्याच्या दुरावस्थेचा फटका बसत होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आणि शाळा व्यवस्थापनाने वेळोवेळी आवाज उठवला होता. मात्र कंत्राटदाराला नोटीस देण्यापलिकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने काहीही केले नाही. परिणामी संतप्त स्थानिक आणि शाळा शिक्षकांच्या यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध संघटना, संस्था, मंडळ यांनी चक्का जाम आंदोलनाला प्रतिसाद दिला होता.
हेही वाचा >>> ठाणे: धावत्या लोकलमध्ये तरूणावर जीवघेणा हल्ला;कळवा-मुंब्रा स्थानका दरम्यानचा प्रकार
शुक्रवारी हे चक्कजाम आंदोलन केले जाणार होते. मात्र त्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात आंदोलकांची भेट घेतली. यात झालेल्या चर्चेनंतर कंत्राटदार कंपनीच्या अक्षम्य हलगर्जीपणा आणि अकार्यक्षमतेमुळे कंत्राटदार कंपनीच्या ऐवजी नव्या कंपनीला काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यमान कंपनी आणि नव्या कंत्राटदारात याबाबतचा करार करण्यात आला. तसेच लवकरच सर्व सुरक्षा व्यवस्था उभारूनच काम करण्यावर एकमत झाले. संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्याच्या आंदोलकांच्या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आंदोलकांच्या प्रतिनिधींनी दिली आहे. या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्याने शुक्रवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले नाही. नागरिकांना त्रास न देण्याचा निर्णय घेत चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. कंत्राटदार बदलल्याने रस्त्याच्या कामात सुधारणा होते का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.