लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : दररोज पाच लाख प्रवाशांची ये-जा असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुविधेसाठी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे. या स्वच्छतागृहात मुतारीसाठी कोणतेही शुल्क नसताना प्रत्येक प्रवाशाकडून मुतारीच्या वापरासाठी दोन रुपयांची वसूली कंत्राटदाराकडून सुरू आहे. याबाबत प्रवाशांनी विचारणा केल्यास तेथील कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना दमदाटी केली जात असून या कंत्राटदारावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सहा ते सात लाख प्रवासी प्रवास करत असतात. मध्य रेल्वे स्थानकातील सर्वाधिक गर्दीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक ठाणे रेल्वे स्थानक आहे. स्थानकात फलाट क्रमांक एक आणि दोन येथे मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आले आहेत. या स्वच्छतागृहाचे कंत्राट दिले आहेत. मुतारी वगळता इतर वापरासाठी स्वच्छतागृहात दर आकारण्यास कंत्राटदाराला परवानगी आहे. असे असतानाही या स्वच्छतागृहांमध्ये प्रत्येक प्रवाशांकडून दोन रुपये आकारले जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. या बाबत एखाद्या प्रवाशाने जाब विचारल्यानंतर त्यांना स्वच्छतागृहातील कर्मचाऱ्यांकडून दमदाटी केली जाते. या स्वच्छतागृहांचा वापर दिवसाला किमान तीनशे ते चारशे प्रवासी वापर करतात. त्यामुळे स्वच्छतागृहाच्या नावाने प्रवाशांची लुबाडणूक सुरू आहे.

आणखी वाचा-विकास विरोधी, शिवसेनेचा विचार काँग्रेसच्या दावणीला बांधलेले सरकार उलथवून टाकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र

तसेच बेकायदेशीररित्या पैसे घेऊन देखील या स्वच्छतागृहाची अवस्था अंत्यत वाईट आहे. काही महिन्यांपूर्वी काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या अशा प्रकारच्या लुबाडणूकीबाबत आंदोलने केली होती. परंतु त्यानंतरही असे प्रवास सुरूच आहेत. विशेष म्हणजे, रेल्वे अधिकाऱ्यांचे कक्ष या स्वच्छतागृहापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यानंतरही पैसे आकारले जात असल्याने तक्रारी कोणाकडे कराव्यात असा प्रश्न प्रवाशांना निर्माण झाला आहे.

स्वच्छतागृहात नियमाव्यतिरिक्त पैसे घेतले जात असतील किंवा अशी तक्रार आल्यास दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल. -पी. डी. पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

स्वच्छतागृहात प्रवाशांची लुबाडणूक सुरू आहे. या प्रकारावर कोणताही आळा बसलेला नाही. जाब विचारल्यास कंत्राटदाराचे कर्मचारी देखील असभ्यपणे प्रवाशांसोबत वर्तन करतात. -राकेश कर्णुक, प्रवासी.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contractor charging rs 2 each from commuters for free toilet at thane railway station mrj