बदलापूरमध्ये जाहिरातींचे फलक, शिडय़ा, सामान स्कायवॉकवर पडून; अंधारामुळे अपघाताची भीती
बदलापूर पूर्व व पश्चिम जोडण्यासाठी व रेल्वेतून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बांधलेला स्कायवॉक सध्या येथे जाहिरात करणाऱ्या ठेकेदाराचे साहित्य ठेवण्यासाठी, भंगार सामान व कचरा करण्यासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथे जागोजागी घाण व अस्वच्छता पसरली असून, येथे ठेवलेले भंगार सामान खाली कोसळून एखादा अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही, त्यामुळे या स्कायवॉकच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
हा स्कायवॉक एमएमआरडीएच्या ताब्यात असून पालिकेने स्कायवॉक ताब्यात घेण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी ठरावही केला आहे. मात्र हा स्कायवॉक पालिकेच्या ताब्यात न आल्याने अद्याप येथे पालिकेला कोणती कारवाई करता आलेली नाही, तर एमएमआरडीने येथे सध्या लक्ष देणे आवश्यक असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे सध्या जाहिरात ठेकेदारच या स्कायवॉकचा पुरेपूर वापर करत असल्याचे उघड झाले आहे.
बदलापूर पूर्वेला स्कायवॉकवर कचऱ्याचे लोखंडी गंजलेले डबे बांधून ठेवण्यात आले आहेत. तसेच जाहिरात ठेकेदाराचे जाहिरातींचे फलक व ज्या शिडय़ांच्या आधारे तो हे फलक लावतो त्या शिडय़ाही येथेच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने हा स्कायवॉक जाहिरात ठेकेदाराला आंदण म्हणून दिला असल्याची ओरड शहरातील नागरिक करत आहेत. तसेच स्कायवॉकवर अनेक ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी ठेवलेले बाकडे आणि पायाखालील लाद्या तुटल्या आहेत. एमएमआरडीए आणि पालिका व रेल्वेच्या वादात हा स्कायवॉक चार वर्षे रखडला होता. आठ वर्षांपूर्वी तयार झालेल्या स्कायवॉकचे दुरुस्तीचे कोणतेही काम होत नसल्याने हा स्कायवॉक दिवसेंदिवस असुरक्षित होत आहे. संध्याकाळी प्रेमी युगल आणि रात्रीच्या वेळेस या स्कायवॉकचा ताबा गर्दुल्ल्यांच्या हातात असल्याने स्कायवॉकवर २४ तास सुरक्षा रक्षक नेमून सीसी टीव्ही लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
बदलापूर पश्चिमेला असलेल्या स्कायवॉकवर तर अनेक ठिकाणी विजेचे दिवे बंद पडल्याने अंधाराचे साम्राज्य पसरल्याने महिलांना येथून ये-जा करतानाही भीती वाटते. मात्र एमएमआरडीए याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्याचा नाहक मनस्ताप बदलापूरकरांना सहन करावा लागत आहे. बदलापूर पालिकेकडून ऑक्टोबर २०१५ मध्येच हा स्कायवॉक पालिकेच्या ताब्यात देण्यात यावा यासाठीचा ठराव मंजूर केल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पालिकेच्या नगररचना विभागातूनच खोडा
एमएमआरडीएदेखील हा स्कायवॉक पालिकेकडे देण्यास तयार आहे. मात्र, पालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाहीसाठी हालचाल होत नसल्याचे एका नगरसेवकाने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. यामुळे मात्र शहरातील नागरिकांना रोज स्कायवॉकवर अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.