योजना वर्षभरासाठी रखडण्याची शक्यता

सागर नरेकर, बदलापूर

कुळगाव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील पहिली भुयारी गटार योजना अयशस्वी ठरल्याने उल्हास नदीत आजही सांडपाणी सोडण्यात येत आहे. पहिली योजना रखडल्याने नगरपालिकेने ७० कोटी रुपयांची नवी योजना पुढे आणली. राज्य सरकारच्या अमृत योजनेतील निधी वापरण्यात येणार आहे. नगरपालिकेने चार वेळा तर जीवन प्राधिकरणाने दोन वेळा या निविदा मागविल्यानंतरही प्रतिसाद मिळालेला नाही.

उल्हास नदी कल्याण, ठाण्यासह अनेक महानगरांची तहान भागवते. बदलापूपर्यंत स्वच्छ असणारा या नदीचा प्रवाह पुढे प्रदूषित होत जातो.  या शहरातील ३०० कोटी रुपयंची वादग्रस्त भुयारी गटार योजना फसली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही.

यावर तोडगा म्हणून अमृत अभियानाअंतर्गत दुसऱ्या भुयारी गटार योजनेला मंजुरी देण्यात आली होती. ७० कोटी रुपयांची योजना आखण्यात आली होती. तीन प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार होती. जीवन प्राधिकरणाने या उदंचन केंद्र आणि वाहिन्या रद्द करून योजनेची रक्कम ३१ कोटी रुपयांवर आणली. त्यामुळे कंत्राटदारांनी पाठ फिरवली. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी चार वेळा निविदा मागवूनही एकाही कंत्राटदाराने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नगरपालिकेने ही योजना जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित केली.

जीवन प्राधिकरणाने २५ कोटी ३३ लाखांच्या कामासाठी दोनदा निविदा मागवल्या होत्या. यात एकाच कंत्राटदाराने प्रतिसाद दिला. मात्र त्यानेही ८० टक्के अधिक दराने निविदा भरल्या. त्यामुळे ही योजना पुन्हा राज्य शासनाकडे पुनर्विलोकनासाठी पाठवली जाण्याची शक्यता असल्याची माहिती पालिकेच्या अभियंत्यांनी दिली. त्यामुळे ही योजना पुन्हा वर्षभरासाठी रखडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तीन ठिकाणी सांडपाण्याचे प्रवाह

याआधीची वादग्रस्त भुयारी गटार योजना अपूर्ण राहिल्याने तसेच नव्याने आखलेल्या योजनेलाही मुहूर्त मिळत नसल्याने उल्हास नदीत सांडपाणी मिसळणे सुरूच आहे. तीन ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर सांडपाणी सोडले जाते. बॅरेज बंधाऱ्यापुढे अनेकदा रासायनिक सांडपाणी सोडले जाते. सर्व यंत्रणांना प्रदूषण रोखण्यात अपयशच येत आहे.