ठाणे : कोपरी येथील संत तुकाराम मैदानात सिद्धेश अभंगे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्या दरम्यान तुफान राडा झाला होता. याचे चित्रीकरण आता समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. एका चेंडूत दोन धावा हव्या असतानाच, खेळाडू बाद झाल्यानंतर हा राडा झाला. आयोजक सिद्धेश (सिद्धू) अभंगे आणि त्याचे सहकारी आणि पराभूत क्रिकेट संघाचे खेळाडू यांच्यामधील राड्याचे पर्यवसन हाणामारीपर्यंत गेले. आयोजक आणि संघातील खेळाडू बॅट, स्टम्प मिळेल ती वस्तू घेऊन एकमेकांसोबत वाद घालत असल्याचे या चित्रीकरणात दिसत आहे. सिद्धेश अभंगे याच्या समाजमाध्यमावरील खात्यावर तो शिंदे यांच्या शिवसेनेच्या युवा सेनेचा पदाधिकारी असल्याचा उल्लेख करतो. याप्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून दोघांच्या तक्रारीमध्ये एकमेकांच्या दिशेने चाकू भिरकावल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संत तुकाराम मैदानात सोमवारी सायंकाळी ६ ते रात्री १० यावेळेत क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेत आठ संघ खेळणार होते. सामना पाहण्यासाठी आयोजक सिद्धू अभंगे आणि त्याचे सहकारी येथील व्यासपीठावर होते. ठाण्यातील एका संघाला शेवटच्या षटकामध्ये १३ धावांची आवशक्यता होती. त्यावेळी पहिल्याच चेंडूत सहा धावा मिळाल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर दोन धावा करताना एक खेळाडू धावचित झाला. पंचाच्या निर्णयावर संघाने विरोध दर्शविला. त्यामुळे सामना अर्धातास स्थगित झाला. चित्रीकरण पाहिले असता, पंचांचा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट झाले. सामन्यात धावा केल्यानंतर आता एका चेंडूमध्ये दोन धावांची आवश्यकता होती. त्याचेवळी खेळाडू बाद झाला. जिंकलेल्या संघाने जल्लोष सुरू करताच, वाद निर्माण झाला. त्यानंतर पराभूत संघ आणि आयोजकांमध्ये वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले.

आयोजक सिद्धेश अभंगे याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संघातील एकाने त्यांच्या दिशेने चाकू भिरकावला होता. तसेच व्यासपीठावरील कुंड्या आणि पारितोषिकांची देखील नासधूस करण्यात आली. तर क्रिकेट संघातील खेळाडूने दिलेल्या तक्रारीमध्येही सिद्धू अभंगे याने चाकू काढून आमच्या दिशेने आल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूकडून तक्रारी दाखल झाल्याने कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, बाचाबाची आणि हाणामारीचे चित्रीकरण आता समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.