ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या नवीन तिसऱ्या खाडी पुलाच्या लोकार्पणाआधी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा पुलाची छायाचित्रफित प्रसारित करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर, या कामाचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचेच असल्याचा दावा माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. यामुळे पुलाच्या लोकार्पणाआधी राष्ट्रवादी आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात श्रेयाची अहमामिका सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा- ‘ती’ चित्रफीत प्रसारित करत खोटा गुन्हा नोंदविला; जितेंद्र आव्हाड यांची समाजमाध्यमांवरील पोस्ट चर्चेत
ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या नवीन खाडी पुलावरील एक मार्गिका तसेच मुंब्रा वाय जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पणास आज दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभुराज देसाई, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या आमदार, खासदार, अधिकारी आणि नागरिक उपस्थित असणार आहेत. ठाणे आणि कळवा तसेच नवी मुंबई या शहरांना जोडणारा ब्रिटिशकालीन खाडीपूल वाहतुकीसाठी बंद केल्याने दुसऱ्या खाडी पुलावरन सद्य:स्थितीत वाहतूक सुरू आहे. वाहन संख्येच्या तुलनेत हा पूल अपुरा पडू लागल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापालिकेने तिसरा खाडी पूल उभारणीचा निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. या प्रकल्पाचे काम पुर्णत्वास आले आहे. विटावा ते ठाणे पोलिस मुखालय अशा एका मार्गिकेचे काम पुर्ण झाले असून ही मार्गिका वाहतूकीसाठी खुली करण्यात येणार आहे. परंतु पुलाच्या लोकार्पणाआधी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते व माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे चित्र आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणतात
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर कळवा पुलाची एक चित्रफीत प्रसारित करून #आपलाच जितेंद्र आव्हाड यांनी मोहर विकासाची असे सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. ठाणे महापालिकेतील कळवा विटावा परिसराची लोकसंख्या लाखोंच्या घरात असूनही हे उपनगर नागरी सुविधांच्या बाबतीत अजूनही मागास आहोत. ठाणे आणि कळवा या दोन्ही मार्गाला जोडण्यासाठी दोन खाडी पूल होते. काही वर्षांपूर्वी पहिला पूल जर्जर झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि त्यामुळे दुसऱ्या खाडी पुलावर दररोज लाखोंच्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू झाली आणि वाहतूक कोंडी होऊ लागली. नागरिकांचा वेळ प्रवास करण्यातच जाऊ लागला. यासाठी तिसरा खाडीपूल वाहतुकीसाठी करणे गरजेचे असल्याने या समस्येचा पाठपुरावा करून तिसऱ्या उड्डाणपुलाला मंजुरी मिळवून त्याचे कामही सुरू करण्यात आले. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे. माझ्या मतदारसंघातील नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्या वेळेची बचत व्हावी,जेणेकरून ते लवकर घरी पोहचून त्यांना आपल्या जिवलगांसोबत अजून थोडा जास्तीचा वेळ घालवता यावा, आणि आपल्या भागातील ट्रॅफिक सुखकर व्हावी हा उद्देश या पूलाच्या निर्मितीमागे आहे. आपले कळवा विटावा आता ट्राफिक मुक्त होणार आहे आणि आपण सगळेच या घटनेचे साक्षीदार आहात, असे आव्हाड यांनी चित्रफितीसोबत केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
नरेश म्हस्के काय म्हणतात
बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते व माजी महापौर नरेश म्हस्के यांनीही पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांना प्रतिउत्तर देत पुलाचे काम आमचेच असल्याचा दावा केला आहे. विकास काम झाले नाही तर दोष सरकारला दिला जातो. मग काम झाले तर सरकारला श्रेय घेवू द्या. मी महापौर आणि सभागृह नेता असताना पुलाच्या कामाचा पाठपुरावा केला होता. वाईटाचे श्रेय आम्हाला देत असाल तर चांगल्याचे श्रेय पण द्या. हे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आहे, असे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.