ठाणे : राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे दिवंगत आनंद दिघे यांचा एकेरी उल्लेख करीत लोकांमध्ये त्यांच्याविषयी संभ्रमाच्या गोष्टी पसरवत आहे, असा आरोप करत शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाण्यात ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर यांनी हिमंत होती तर, कार्यालयावर येवून दाखवायचे होते असा इशारा दिला. या प्रकरणामुळे ठाणे शहरात काही काळ तणावाचे वातवरण निर्माण झाले होते.
धर्मवीर आनंद दिघे हे कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करण्यात येत आहे. दिघे साहेबांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तुरुंगा बाहेर काढले. तसेच दिघे हे संरक्षण वाढविण्यासाठी माझ्या घरी यायचे असे आक्षेपार्ह विधान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याचा आरोप करत शिंदे गटाने ठाण्यात खासदार राजन विचारे यांच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यास नकार देत, मोर्चा मध्येच अडविला. यावेळी शिंदे गटाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार हे जितेंद्र आव्हाड हे ठाणेकरांमध्ये दिघे यांच्या बाबत संभ्रमाचे वातवरण पसरवत असल्याचा आरोप करीत, महसूल खात्याची फेराफेरी झाल्यानंतर ते स्वत: आनंद आश्रमाचे उंबरठे झिजवत होते असा आरोप केला. तसेच आनंद दिघे हयात असताना, विरोधकांकडून कधीही फलकबाजी करण्यात आली नव्हती. पण आज दिघे यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे असो दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे गप्प आहेत. केवळ राजकारणासाठी दिघे यांच्या नावाचा वापर करत असल्याचा आरोप देखील शिंदे यांनी केला.
हेही वाचा >>>खळबळजनक! १४ पिस्तुल, ८० जिवंत काडतुसे, २५ मॅगझीन जप्त; बुलढाण्यात ठाणे पोलिसांची धडक कारवाई
तर, दुसरीकडे ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्याही आक्रमक झाल्या. ठाकरे गटाच्या जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर यांनी मीनाक्षी शिंदे यांचे नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली. मुळात त्यांना दिघे माहित आहे का? जी बाई शिवसेना महिला आघाडी काय हे विचारायला वर जावू का असा प्रश्न करते. तिला आनंद दिघे कितपत कळले. आमदारकी मिळविण्यासाठी हे सर्व सुरु आहे. हीमत असेल तर, भिडून दाखवा असा इशारा देखील खोपकर यांनी यावेळी दिला.