कल्याण : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार यांची ठाणे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता पदावर नेमणूक करण्याची मागणी भाजप नेते, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या पत्राची गंभीर दखल घेऊन याविषयी कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. या विषयीची कुणकुण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक ठाणे जिल्ह्यातील काही आमदारांना लागताच त्यांनी ठाणे येथील विद्यमान अधीक्षक अभियंता कांबळे यांची मुदतपूर्व बदली करू नये. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि त्यांच्याकडे कामाचा झपाटा असल्याने जिल्ह्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी त्यांची खूप आवश्यकता आहे,अशी पत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहेत.
हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?
या परस्पर विरोधी पत्रापत्रीवरुन ठाणे जिल्ह्यात भाजप नेते केंद्रीय मंत्री कपील पाटील विरुध्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक भिवंडीचे आ. शांताराम मोरे, अंबरनाथचे डाॅ. बालाजी किणीकर, भाजपचे मुरबाडचे आ. किसन कथोरे यांच्यात संघर्षाची चिन्हे आहेत. या पत्रावरुन मंत्री पाटील यांना अधीक्षक अभियंता नेमणुकीवरुन एकाकी पाडण्याचा प्रयत्न शिंदे समर्थक आमदारांनी केला असल्याची चर्चा सुरू आहे. या संघर्षात भाजप आ. कथोरे यांनीही उडी घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कथोरे आणि कपील पाटील यांचे सख्य सर्वश्रृत आहे. त्यामुळेच कथोरे यांनी शिंदे समर्थक आमदारांच्या बाजुने उडी घेतल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या
एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार यांना सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे येथे पदस्थापना देण्याची मागणी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी १० ऑगस्ट २०२२ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. फडणवीस यांनी संबंधितांना हिरव्या हस्ताक्षरात तातडीने याविषयी कार्यवाही करण्याचे आदेश दिले.विलास कांबळे यांच्यासारख्या कामाचा उरक असलेल्या, जिल्ह्याची भौगोलिक जाण असलेल्या अधीक्षक अभियंत्याची केंद्रीय मंत्री पाटील बदली करू इच्छितात याची माहिती मिळताच आ. कथोरे, आ.किणीकर, आ. मोरे यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रे देऊन अधीक्षक अभियंता कांबळे हे दीड वर्षापासून ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील रस्ते, पूल, सरकारी इमारतींची महत्वाची कामे त्यांनी पाठपुरावा करुन मार्गी लावली आहेत.
अतिशय झपाट्याने काम करणारा आणि एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून कांबळे यांची ओळख आहे. ठाणे जिल्ह्यात कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, भिवंडी, मुरबाड भागात अनेक विकास कामे प्रस्तावित आहेत, मनोर-भिवंडी रस्ता, सामान्य रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र, शासकीय आश्रम शाळांची उभारणी, देखभाल होणे बाकी आहे. अशा परिस्थितीत अधीक्षक अभियंता कांबळे यांची बदली करणे उचित होणार नाही. कांबळे यांचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला नसताना त्यांची मुदतपूर्व बदली करणे उचित होणार नाही, अशी पत्रे आ. कथोरे, आ. किणीकर, आ. मोरे यांनी दिली आहेत.कांबळे, देवेर या अभियंत्यांच्या पदस्थापनेवरुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्रे देण्यात आल्याने हे दोन्ही उच्चपदस्थ काय निर्णय घेतात याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर अभियंत्यांच्या पदस्थापनेवरुन भाजप विरुध्द शिंदे गट असा सामान रंगणार असल्याची चिन्हे आहेत.
अधिकारी कोण यापेक्षा तो किती तत्परतेने विकास कामे करतो हे महत्वाचे. आपणास काम करणारा माणूस पाहिजे. ठाणे जिल्ह्यातील विकास कामे अधीक्षक अभियंता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लागत आहेत. काही प्रस्तावित आहेत. ती कामे वेळेत पूर्ण करतील असा विश्वास आहे. त्यामुळे त्यांची बदली करू नका अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. – किसन कथोरे , आमदार, मुरबाड