डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली भागात मंगळवारी सकाळी एक महिला आपल्या सोसायटीच्या आवारात दुचाकी घेऊन जात होती. सोसायटीच्या प्रवेशव्दारावर एक तरूण उभा होता. त्याला महिलेने एक्सक्युज मी म्हणत त्या तरूणाला सोसायटी प्रवेशव्दारातून बाजुला होण्याची विनंती केली. त्या तरूणाने काही क्षणात मागे फिरून मराठीतून बोला, असे म्हणत दुचाकीवरील महिलांना धमकावले.

मराठीतून बोला असा आग्रह तरूणाने धरला. त्यावेळी दुचाकीवर एक महिला दुचाकी चालवित होती. दुसरी महिला तिच्या पाठीमागे दुचाकीवर एक नऊ महिन्याचे बाळ घेऊन बसली होती. मराठीतून बोलत नाही म्हटल्यावर तरूणाने दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या महिलेचा हात पिरगटुन तिला मराठी कशी बोलत नाहीस, असा प्रश्न केला. हा प्रकार सोसायटीच्या प्रवेशव्दारात सुरू होता.

आव्हान देणाऱ्या तरूणाचे घर सोसायटीच्या तळमजल्याला होते. त्यावेळी त्या तरूणाच्या घरातील कुटुंबीय यामध्ये चार ते पाच महिला आणि तीन तरूणा्ंनी मराठी भाषेतून बोलत नाहीत म्हणून दोन्ही महिलांना सोसायटी आवारात बेदम मारहाण केली. यावेळी एका महिलेच्या कडेवर बाळ होते. या मारहाणीत त्या बाळाची आबाळ झाली. याची पर्वा मारहाण करणाऱ्यांनी केली नाही.

एक्सक्युज मी हा नेहमीच्या वापरातील शब्द आहे. त्यामुळे तो बोलला म्हणजे मराठी भाषेचा अपमान होत नाही. असे असताना किरकोळ कारण पुढे करून आम्ही दोन्ही महिलांना सात जणांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी आम्ही विष्णुनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरुध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे, असे तक्रारदार महिलेने सांगितले.

मनसेने मराठीतून भाषेच्या वापरासाठी बँकांमध्ये मोहीम सुरू केली होती. या कालावधीत काही बँक अधिकाऱ्यांबरोबर मनसे कार्यकर्त्यांचे वाद झाले. काही ठिकाणी मारामारीचे प्रकार घडले. ग्राहक सेवेच्या ठिकाणी असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. कोणीही कायदा हातात घेऊ नये, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर मनसेने आपले मराठी भाषा वापर आंदोलन थंड केले आहे. पण त्याची धग जुनी डोंबिवलीतील प्रकाराने दिसू लागल्याने पोलिसांनी अशा मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

गेल्या वर्षी कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला मराठी भाषक म्हणून एका कुटुंबाने बेदम मारहाण केली होती. हे प्रकरण विधीमंडळापर्यंत गाजले होते. एक हिंदी भाषक शासकीय अधिकारी याप्रकरणात मुख्य आरोपी होता.