नवी मुंबई, कल्याण : कल्याण तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिका हद्दीत समावेश नको या मागणीसाठी वनमंत्री गणेश नाईक एकीकडे आक्रमक झाले असताना या मुद्दयावरुन कल्याण लोकसभा मतदारसंघातील राजकारणाही तापू लागले आहे. नाईक यांनी या प्रश्नावर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नवी मुंबईकरांसाठी हा निर्णय हिताचा नाही अशी भूमीका घेतली. यासंबंधीचे वृत्त लोकसत्ताने देताच कल्याण ग्रामीणचे शिवसेना (शिंदे) आमदार राजेश मोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत ही गावे नवी मुंबईतच हवीत अशी भूमीका मांडली आहे. दरम्यान, या मतदारसंघाचे माजी आमदार राजू पाटील यांनी मात्र शिंदे पिता-पुत्रावर टिका करत हा निर्णय घाईघाईत का घेण्यात आला, असा सवाल उपस्थित केला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारने शीळ-तळोजा रस्त्यावरील ही १४ गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना नवी मुंबई महापालिका परिसरातील राजकीय नेते तसेच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले नाही असा आक्षप तेव्हाही गणेश नाईक यांनी नोंदविला होता. डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात ही गावे मोडतात. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. दरम्यान, राज्यात नवे सरकार स्थापन होताच मंत्री मंडळात स्थान मिळालेले गणेश नाईक यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमीका घेत ही गावे नवी मुंबईत नकोत असे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविल्याने कल्याण, नवी मुंबई पट्टीत हा राजकीय वादाचा मुद्दा बनला आहे. दरम्यान नाईक यांनी यासंबंधीचे पत्र देताच कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजेश मोरे अचानक सक्रिय झाले असून त्यांनी ही गावे नवी मुंबईतच रहावीत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
नाईक-शिंदे वादाचा केंद्रबिंदू
१४ गाव सर्व पक्षीय विकास समितीमध्ये सर्व पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. १४ गावांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. शिंदे यांच्या माध्यमातून रस्ते आणि इतर विकास कामे सुरू आहेत. भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी १४ गावांमधील रस्ते कामांसाठी ३५ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. असे असले तरी या गावांच्या समावेशाचा मुद्दा गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या वादाचा केंद्रबिंदू ठरु लागला आहे. येथील गावांच्या विकासासाठी लागणारा खर्च नवी मुंबईकरांच्या कररुपी पैशातून का करावा असा सवाल करत गणेश नाईक यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. नाईक यांच्या भूमीकेमुळे नवी मुंबईतील त्यांच्या राजकीय विरोधकांची अडचण झाली आहे. तर हा मुद्दा हाती घेत शिंदेसेनेने १४ गावांच्या बाजूने उभे रहाण्याचा निर्णय घेतल्याने नवी मुंबई आणि कल्याण लोकसभा अशा दोन वेगवेगळ्या राजकीय मैदानांवर यासंबंधीचे राजकारण रंगू लागले आहे. सर्व पक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांना सोबत ठेऊन गावांबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १४ गावच्या ग्रामस्थांच्यासह भेट घेऊन १४ गावांच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याची मागणी केली आहे. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी मात्र निवडणूक काळात १४ गावे ज्या तत्परतेने नवी मुंबई पालिकेत शिंदे पिता पुत्रांनी समाविष्ट केली. त्याच गतीने त्यांनी या गावांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक होते, अशी भूमिका घेत राजू पाटील यांनी शिंदे पिता पुत्रांना लक्ष्य केले आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनीही १४ गावे विकास कामांपासून वंचित आहेत. याठिकाणी विकासासाठी निधीच मिळणार नसेल तर येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निवडणुका घेऊन ग्रामपंचायतीचा कारभार सुरू करावा, अशी भूमिका घेतली आहे.
१४ गावांच्या विकासासाठी सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. भौगोलिकदृष्ट्या १४ गावे नवी मुंबई शहराजवळ आहेत. एका आखीव शहराचा भाग म्हणून या शहराला १४ गावांची पसंती आहे. गावांमध्ये विविध प्रकारची विकास कामे सुरू आहेत. लवकरच आम्ही वनमंत्री नाईक यांची भेट घेणार आहोत.- लक्ष्मण पाटील अध्यक्ष.
१४ गाव सर्व पक्षीय विकास समिती
१४ गावांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या गावांमधील अत्यावश्यक नागरी विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.- राजेश मोरे, आमदार.