डोंबिवलीतल्या सुनील नगर भागात कवयित्री बहिबाई चौधरी उद्यान आहे. या उद्यानात बांधण्यात येणाऱ्या वाचनालयावरुन शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. बाग लहान मुलांना खेळण्यासाठी आहे. मग तिथे वाचनालय बांधून कसं चालेल? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाने विचारला आहे. तसंच हे वाचनालय होऊ देणार नाही अशीही भूमिका घेतली आहे.

काय आहे उद्यानातील वाचनालयाचं प्रकरण?

डोंबिवली पूर्वेतील सुनील नगर या ठिकाणी संत बहिणाबाई चौधरी उद्यान आहे. या उद्यानात लहान मुलं, महिला, वयोवृद्ध येत असतात. या उद्यानात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून सुसज्ज असे वाचनालय तयार होणार आहे. या कामाची पाहणी रविवारी काही अधिकारी वर्गाकडून करण्यात आली. हे काम शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्याकडून होणार आहे. या वाचनालयाच्या कामाला स्थानिक नागरिकांसह शिवसेना ठाकरे गटाने प्रचंड विरोध केला आहे.

नागरिकांनी नेमकं काय म्हटलं आहे?

सुनील नगर रहिवाशांचा उद्यानात होणाऱ्या वाचनालयाला विरोध आहे. कारण वाचनालय झालं तर लहान मुलांना खेळण्यासाठी जागा उरणार नाही. तुमच्या भागांत तुम्हाला जे करायचं आहे ते करा असं स्मिता अंकुश पाटील यांनी सांगितलं. तर शांताराम धरणे म्हणाले, लहान मुलं या ठिकाणी खेळायला येतात. तिथे ही जाहिरातबाजी होते आहे, हा काय प्रकार आहे? चांगली लोक या ठिकाणी राहतात. काहीतरी विकृत घडू नये इतकीच माझी भूमिका आहे.

ठाकरे गटाचे अभिजित सावंत यांचं म्हणणं काय?

शिवसेना शहर प्रमुख अभिजीत सावंत यांचे म्हणणे आहे की, आम्हाला काही दिवसांपूर्वी हे समजलं की काही व्यक्ती उद्यानाच्या आतमध्ये वाचनालय बांधण्याचा घाट घालत आहेत. समोरच महापालिकेचं वाचनालय आहे ज्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. ते अजूनही बंद आहे. ते वाचनालय सुरु कोण करणार? स्वतःच्या स्वार्थासाठी उद्यानामध्ये वाचनालय बांधत आहेत. उद्यान लहान मुलांसह वयोवृद्धांसाठी आहे. एखादे वाचनालय तयार झाले तर हे उद्यान लहान होईल. त्यामुळे आम्ही काम बंद पाडलं आहे. या उद्यानाचा तसा काहीच फायदा वाचनालय झाल्यानंतर होणार नाही. त्यामुळे आम्ही हे वाचनालय होऊ देणार नाही. समोरच वाचनालय आहे तिथे अभ्यासिका सुरु करा, पुस्तकं ठेवा असंही अभिजित सावंत यांनी म्हटलं आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नितीन पाटील यांनीही म्हणणं मांडलं आहे.

शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नितीन पाटील काय म्हणाले?

आम्ही उद्यानातील कुठलाही वॉक वे तोडणार नाही. जी जागा वाया जाते आहे तिथे ज्य़ेष्ठ नागरिकांना बसायला जागा, टीव्ही वगैरे लावण्यात येईल. वातानुकुलित ग्रंथालय असेल. हे सगळं करण्याआधी तिथल्या नागरिकांची आम्ही भेट घेतली. त्यानंतर खासदारांकडे निधीची मागणी केली. तिथे सुस्सज ग्रंथालय उभं राहतं आहे, त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखतं आहे. आज जर त्या उद्यानाकडे पाहिलं तर ते उद्यान आहे की जाहिरातींचा अड्डा आहे? असा प्रश्न पडतो. त्या ठिकाणी पदपथावर जाहिराती मोठमोठ्या आहेत, त्या अनधिकृत आहेत. आम्ही जे काही करतोय ते अधिकृत आहे असं नितीन पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता वाचनालयावरुन शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक पाहण्यास मिळते आहे.