‘जसा देश तसा वेश’ अशी आपल्याकडे म्हणच आहे. पण हवामानानुसार कपडय़ांच्या पेहरावात होणारा बदल अधिक ठळक असतो. उन्हाळ्यात वापरल्या जाणाऱ्या कापडय़ांना फॅशनच्या जगात ‘कुल फॅब्रिक्स’ म्हटले जाते. लेस, कॉटन व सिल्क विस्कॉस बरेबर चिकन, ट्रॉपिकल वूल हे समर स्पेशल असुन यामुळे घाम शोषला जातो आणि हवा खेळती राहते.
उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसातली नजाकत आता सरली असून गेल्या काही दिवसांत उन्हाने भलतेच रौद्र रूप धारण केले आहे. अशा या उन्हाळ्यात अगदी हलकंसं, सुटसुटीत काही तरी घालून बाहेर पडावं आणि शक्य तितकी या हैराण करणाऱ्या उकाडय़ापासून सुटका करून घ्यावी, असे प्रत्येकाला वाटत असते. फॅशनमध्ये ऋतूनुसार बदल होतो.
रोजच्या रोज वापरण्यासाठी कॉटन योग्य असलं तरी ते लगेच चुरगळतं. तरीही चुरगळलेल्या कपडय़ांना या जगात ‘क्रश’ असेही म्हणतात. डेनिम हे ‘एव्हरग्रीन’ आणि प्रत्येक ऋतूमध्ये वापरलं जाणारं फॅब्रिक आहे. उन्हाळ्यात फिक्कट रंगांचा सर्वाधिक वापर केला जातो. पण त्याला पर्याय आहेत. प्लेन कापड आणि त्यावर फिकट रंगाचं प्रिंट हा आजचा ट्रेंड आहे. पांढऱ्या रंगांतील विविध प्रकार सध्या लोकप्रिय आहेत. त्यात काही रंगांचा समावेश केला जातो. फ्लोईंग फ्लोरल प्रिंट म्हणजे एक डिझाइन पूर्ण ड्रेसवर किंवा एकाच ड्रेसवर वेगवेगळं डिझाइन आणि अनेक रंग, ब्लॉक प्रिंटिंगचा ट्रेंड आहे. यामध्ये टेंडर म्हणजे फिकट रंगछटा असणारे. अर्थी म्हणजे पृथ्वीशी संबंधित पारवा, लाल आणि हिरव्या रंगांच्या छटा. फ्लोरल म्हणजे वेगवेगळ्या फुलांचे रंग. उदा. फिकट जांभळा, निळा, गुलाबी व पेस्टल रंगही ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
उन्हाळ्यासाठी काही खास पेहेराव
पलाझ्झो-
उंच असा सुटसुटीत पायघोळ असलेल्या या पॅन्टला फॅशनच्या दुनियेत पलाझ्झो पॅन्ट म्हणतात. फुलांच्या नक्षीने बहरलेल्या पलाझ्झो पॅन्ट सध्या बाजारामध्ये अधिक लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. लिनन कापडाच्या पलाझ्झो आणि वर मंद रंगसंगतीचे, एकाच रंगातले टॉप्स किंवा शर्ट्स घालणे तरुणी पसंत करूलागल्या आहेत.
स्कार्फ-
प्रदूषण आणि चटके बसवणाऱ्या उन्हापासून संरक्षण म्हणून वापरले जाणारे स्कार्फ पुन्हा नव्या फॅशनमध्ये येत आहेत. वजनाला हलके आणि उन्हापासून संरक्षण करणारे टोल्स आणि स्कार्फ सध्या लोकप्रिय असुन कॉटन, सिल्क, पश्मिरा,काश्मिरी सिल्क फॅब्रिक्समध्ये आहेत.
कॉटन जम्पसूट-
सध्या बाजारामध्ये सुटसुटीत अशा जम्पसूटची चलती आहे. टॉप आणि पॅण्टचा एकत्रित अवतार म्हणजे जम्पसूट. उन्हाळ्यामध्ये कॉटनचे जम्पसूट सर्वाधिक वापरले जातात. अशा प्रकारच्या जम्पसूटमुळे तंग जीन्सपासून सुट्टी मिळते. पुन्हा त्यावर कोणता टी-शर्ट घालू असा प्रश्नही पडत नाही.
कफ्तान
कफ्तान हा काही आधुनिक पेहराव नाही. तो सुलतानशाहीपासून चालत आलेला शाही पेहराव आहे. कफ्तान म्हणजे कोट. पूर्वी राजे-महाराजे थंडीवाऱ्यापासून संरक्षणासाठी कफ्तान परिधान करत. आता फॅशनच्या या ‘कुल’ जगतात सर्वाधिक पसंती ही कफ्तानला मिळत आहे. एका मोठय़ा ओढणीचे दोन भाग करून त्यांच्या दोन्ही बाजू शिवून गळ्याला आकर्षक अशी नक्षी देण्यात येते. अशा प्रकारचे कफ्तान कार्यालयात जाण्यासाठी वापरणे महिला पसंत करतात. यामध्ये आकर्षक रंग वापरले जातात.
लाँग शर्ट–
दिवसेंदिवस तापमान वाढतेय. अंगाची काहिली होतेय. अशा वेळी लाँग शर्ट हा प्रकार तरुणींच्या अधिक पसंतीचा बनत चालला आहे. सर्वसाधारण शर्टस्पेक्षा उंचीने लांब व खालच्या बाजूला अॅपलकट (अर्धगोलाकार) असलेला हा शर्ट कॅज्युअल आणि फॉर्मल अशा दोन्हींवर शोभून दिसतो.लाइट ग्रे, बिस्कीट कलर, मॅन्गो कलर आदी रंग वापरले जातात.
वनपीस ड्रेसेस्
तरुणी उन्हाळ्यामध्ये सैल कपडे घालणे पसंत करतात. त्यामध्ये उत्तम पर्याय म्हणजे वनपीस ड्रेस. यामध्ये काही पूर्ण बाह्य़ांचे तर काही स्लिव्हलेस असे काही आकर्षक वनपीस सौम्य रंगामध्ये उपलब्ध आहेत.
मेश टॉप-
मेश हा टॉपस्चा आधुनिक प्रकार आहे. पारदर्शक असणारे अशा प्रकारचे टॉपस् सध्या महाविद्यालयीन तरुणींना भुरळ घालत आहते. या टॉपमध्ये रंगीबेरंगी स्पेगेडी (गंजी) घालणे मुली पसंत करतात. पांढऱ्या रंगाच्या टॉपमध्ये काळा किंवा कोणत्याही गडद रंगाची स्पेगेडी, पांढऱ्या टॉपमध्ये काळी स्पेगेडी असे विविध रंगाचे प्रयोग यामध्ये करू शकतो.
कुठे- गावदेवी मार्केट, राम मारुती रोड, कोरम मॉल, विविआना मॉल.
किंमत- ५०० ते १००० च्यापुढे.