‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या सहकाराच्या मूलमंत्रानुसार कल्याणमधील ‘महिला सहकारी उद्योग मंदिर’ आणि ‘आदर्श सहकारी ग्राहक संस्था’ या संस्थांनी एकत्र येत ‘सहकार मंदिर’ ही वास्तू १३ वर्षांपूर्वी उभारली. शहरातील सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना या वास्तूने एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या सहकारी संस्थेविषयी..

आठ दशकांपूर्वी जेव्हा महिलांचे जग बऱ्याच प्रमाणात ‘चूल आणि मूल’ एवढय़ापुरतेच मर्यादित होते, तेव्हा कल्याण शहरात महिलांना रोजगारास उद्युक्त करणारी ‘महिला सहकारी उद्योग मंदिर’ ही संस्था अस्तित्वात आली. सणासुदीनिमित्त घरोघरी लागणाऱ्या वस्तू, खाद्यपदार्थ तयार करून प्रदर्शनाच्या tv07माध्यमातून विक्री करण्याचा उपक्रम संस्थेने राबविण्यास सुरुवात केली. त्यातून अनेक महिलांना स्वयंरोजगाराचा मार्ग सापडला. त्यानिमित्ताने परिसरातील महिला एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधू लागल्या.
कल्याण शहरात आग्रा रोडवर मोक्याच्या ठिकाणी महिला सहकारी उद्योग मंदिर या संस्थेच्या मालकीचा भूखंड होता. मात्र त्या ठिकाणी वास्तू बांधणे आर्थिकदृष्टय़ा संस्थेला शक्य नव्हते. त्यामुळे दुसऱ्या एखाद्या संस्थेच्या मदतीने इमारत बांधण्याचा विचार दोन दशकांपूर्वी सुरू झाला. त्याच वेळी कल्याण जनता सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष मोहन आघारकर हे पुणे येथील वैकुंठभाई मेहता प्रशिक्षण संस्थेत सहकारी बँकांसंदर्भात आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी गेले होते. त्या ठिकाणी झालेल्या चर्चेत सहकारी कायद्यान्वये दोन अथवा त्यापेक्षा अधिक सहकारी संस्थांना एकत्र येऊन संयुक्त प्रकल्प राबविता येतो, अशी माहिती त्यांना मिळाली. त्यांनी महिला सहकारी उद्योग मंदिर आणि आदर्श सहकारी ग्राहक संस्था या दोन संस्थांपुढे अशा प्रकारे संयुक्त प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव ठेवला. दोन सहकारी संस्थांनी आपापल्या सर्वसाधारण सभेमध्ये याविषयी चर्चा केली आणि सहकार मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आदर्श सहकारी संस्था गेली पाच दशके कल्याणमध्ये ग्राहकांच्या हिताचे उपक्रम राबवीत आहे.
देणग्या आणि ठेवी
वर्षांनुवर्षे समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या या संस्थांच्या विश्वासार्हतेमुळे वास्तू उभी राहण्यास निधी कमी पडला नाही. देणगी, सव्याज अथवा बिनव्याजी ठेवी स्वरूपात कल्याणकरांनी निधी दिला. दिवंगत शरदचंद्र ओक यांनी पहिल्या मजल्याच्या सभागृहासाठी पाच लाख रुपयांची देणगी दिली. कल्याण जनता सहकारी बँक आणि वसंत फडके यांनी  प्रत्येकी एक लाख रुपयांची देणगी दिली. याशिवाय अनेक कल्याणकरांनी व्याजी अथवा बिनव्याजी ठेवी या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिल्या. गेल्या १२ वर्षांत या सर्व ठेवींची संस्थेने परतफेड केली असून आता हा प्रकल्प स्वयंपूर्ण झाला आहे.
हक्काचे व्यासपीठ
दोन्ही संस्थांना त्यांचे वर्षभरातील नियमित उपक्रम राबविण्यासाठी एक हक्काची जागा या सहकार मंदिरामुळे उपलब्ध झाली. ग्राहकपेठ, सहकारी संस्थांच्या सभासदांसाठी अभ्यासवर्ग आदी उपक्रम इथे राबविले जातात. याशिवाय शहरातील इतर संस्थांनाही अल्पदरात हे सभागृह उपलब्ध करून दिले जाते. एरवी वर्षभर व्यावसायिक तत्त्वावर हे सभागृह विविध कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर दिले जाते. त्यातून वास्तूच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च निघतो.
ग्राहकांच्या हितासाठी
आदर्श सहकारी ग्राहक संस्थेचे सध्या सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. सुरुवातीच्या काळात डिपार्टमेंट स्टोअर्सद्वारे परिसरातील ग्राहकांना संस्था जीवनावश्यक वस्तू किफायतशीर दरात उपलब्ध करून देत होती. या क्षेत्रात स्पर्धा वाढल्यानंतर त्यांनी हा उपक्रम बंद केला. राजाराम बापू पाटील दूध उत्पादक संघाने त्यांच्या ‘कृष्णा’ ब्रॅन्डने विकल्या जाणाऱ्या दुग्धजन्य उत्पादनांची एजन्सी संस्थेला दिली आहे. याशिवाय वीज वितरण कंपनीने संस्थेला देयक वसुली केंद्र दिले. कल्याणमध्ये संस्थेचे पाच ठिकाणी वीजदेयक वसुली केंद्रे आहेत. त्याद्वारे १२ गरजू लोकांना रोजगार मिळाला आहे.   
सिडकोचे माजी अध्यक्ष दिवंगत नारायणराव मराठे यांच्या हस्ते ‘सहकार मंदिर’ वास्तूचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर ही टोलजंग इमारत उभी राहिली. या संस्थेने कल्याण शहरातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना एक चांगले व्यासपीठ मिळवून दिले आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी मकरसंक्रातीनिमित्त हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले जाते आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील महिलांना गृहोपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात येतात.

दिवाळीचा फराळ परदेशातही
*महिला सहकारी उद्योग मंदिरातर्फे जानेवारी महिन्यात तीळगूळ आणि दिवाळीत फराळ हे दोन मुख्य उपक्रम राबविले जातात. ग्राहकपेठ भरवून या उत्पादनांची विक्री केली जाते. त्यातून महिलांना रोजगार मिळतो.
*संस्थेद्वारे उत्पादित दिवाळी फराळाला परदेशातही मागणी आहे. संक्रांतीच्या हळदी-कुंकू समारंभानिमित्त परिसरातील आर्थिकदृष्टय़ा गरीब महिलांना उपयोगी वस्तू भेट देण्याचा समाजोपयोगी उपक्रम गेली काही वर्र्षे संस्थेच्या वतीने राबविण्यात येतो.  
*श्रावण महिन्यात मंडळातर्फे ‘नाच ग घुमा’ हा मंगळागौरीचा कार्यक्रम होतो. कल्याण-डोंबिवली परिसरात या उपक्रम भलताच लोकप्रिय आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सादर करणारे दोन संच तयार करण्यात आले आहेत.
*या कार्यक्रमातून कुणीही व्यक्तिगत मानधन घेत नाही. तो सर्व निधी संस्थेत जमा होतो. लोकोपयोगी कार्यासाठी त्याचा उपयोगा होतो, अशी माहिती संस्थेच्या मेघा आघारकर यांनी दिली.